पणजी - कोरोना संसर्गाचे सावट थोडे दूर झाल्यानंतर गोवा सरकारने पर्यटनासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडत नववर्ष स्वागतासाठी गोव्यात मोठ्या संख्येने दाखल झाले आहे. सर्व समुद्र किनारे देशी पर्यटकांनी फुलले आहेत. तर विदेशी पर्यटकांची उणीव स्पष्ट दिसत आहे.
मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागत यासाठी देशविदेशातील पर्यटक गोव्याला पसंती देत ख्रिसमसपासून गोव्यात दाखल होत येथील निसर्ग आणि आदरातिथ्य यांचा आनंद घेत असतात. यावर्षी मात्र, कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावामुळे यावर बंधने आली आहेत. तरीही सरकारने मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देत पर्यटन व्यवसाय सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे मागील महिन्यांपासून काही हॉटेलमध्ये आगाऊ नोंदणी सुरू झाली होती. मात्र, हे सर्व पर्यटक देशाच्या विविध भागातील आहे.
दरवर्षी दिसणारी विदेशी पर्यटकांची गर्दी नाही की, त्यांचे दर्शनही नाही. यावर्षी इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक नाही. सर्व समुद्र किनारे देशी पर्यटकांनी फुललेले दिसत आहेत. लोक समुद्रस्नान, पाण्यातील साहसी खेळ यांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. त्याबरोबरच मांडवी नदीतील तरंगत्या कँसिनोचा आनंद घेत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागतासाठी गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांनी आपली आणि इतरांची सुरक्षा पहावी असे आवाहन करताना गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर म्हणाले, कोणीही गोव्यात येऊन येथील नैसर्गिक सौंदर्य याचा आनंद घेऊ शकतो. हे करत असताना 'गोंयकारपण' टीकवून ठेवले पाहिजे. त्याबरोबरच विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचेही पालन करावे. गोवा हे उत्तम पर्यटन स्थळ आहे. लोक खरा गोवा पाहू इच्छितात. पर्यटनाचा आनंद घेताना मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर याकडे लक्ष दिले पाहिजे.
पर्यटकांनी नववर्ष स्वागतासाठी आपली गोव्यालाच पहिली पसंती असल्याचे सांगितले. यामधील काहींनी यापूर्वी गोव्यातील नववर्ष स्वागताचा आनंद घेतला आहे. तर काही नववर्ष स्वागत आणि हनीमून असा उद्देश ठेवत गोव्यात आल्याचे सांगितले. येथील आदरातिथ्य खूप भावल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. पर्यटकांचा ओढा लक्षात घेऊन प्रत्येक चौक, समुद्र किनारे, बाजारपेठा, बसस्थानक यारख्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा - पोलिसांवर गोळीबार करुन पळवलेल्या कैद्याला महाराष्ट्र सीमेवरून अटक
हेही वाचा - जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 दहशतवादी ठार