पणजी- कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक हे झोकून देत आपले काम पूर्ण करतात. परंतु, तयार केलेली कलाकृती चित्रपटगृहात जाऊन पाहणे ही प्रेक्षकांची जबाबदारी आहे. वाढत्या स्पर्धेत मनोरंजनाचे माध्यम म्हणून चित्रपटाचे अस्तित्व टिकवणे हे सर्वस्वी प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे, असे मत अभिनेता ललित प्रभाकर यांनी व्यक्त केले. सध्या सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ते गोव्यात आले आहे. त्यांनी अभिनय साकारलेला ' आनंदी गोपाळ' यामध्ये दाखविण्यात आला आहे.
कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न आहे. जे मला करावेसे वाटत नाही, असे चित्रपट मी स्पष्टपणे नाकारतो, असे सांगत प्रभाकर म्हणाले, मला नाटकात काम करायला आवडतं. त्याची प्रक्रिया आवडते. पण सध्या चित्रपट मोठ्या प्रमाणात करत आहे.
मनोरंजनाची माध्यमे आणि त्यांचे स्वरूप बदलत आहे, अशावेळी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी आकर्षित करण्यासाठी काय करणार आहात, असे विचारले असता ललित प्रभाकर म्हणाले, एक कलाकार म्हणून मेहनतीने निवडलेल्या गोष्टी प्रेक्षकांसमोर ठेवत असतो. त्यानंतर ते प्रेक्षागृहात जाऊन बघणे ही लोकांची जबाबदारी आहे. बघून त्यावर बरा-वाईट जो असेल तो प्रतिसाद द्यावा. प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळणे अवलंबून आहे. कला आणि संस्कृती या माध्यमातून पुढे नेले जात असते.
भविष्यात कोणती भूमिका करायला आवडेल, असे विचारता प्रभाकर म्हणाले, मला अँक्शन, हॉरर आदी सर्वच प्रकारचे अस्तित्वात असलेले प्रकार करायचे आहे. जे उपलब्ध नाही निर्माण करावयाचे आहे.