पणजी - गोव्याची राजधानी पणजीत आजपासून सुरू होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) तयारीचा आढावा काल मंगळवार (दि.19 नोव्हे.) संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला. आज दुपारी 3 वाजता ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी अभिनेता अमिताभ बच्चन आणि रजनीकांत उपस्थित राहणार आहेत.
इफ्फी परिसराचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, इफ्फी ठिकाणांचा आढावा घेण्यात आला असून तयारी पूर्ण झाली असून गोवा उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रतिनिधी नोंदणीला चांगला प्रतिसाद लाभला असून 9 हजार 300 जणांनी नोंदणी केली. ज्यामधील 7 हजारांनी शुल्क भरून आपले नाव निश्चित केले आहे. सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने यावेळी विशेष गोवा विभाग तयार करून त्यामध्ये 7 चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. 5 ठिकाणी खूल्या जागेत तसेच काही तालुक्यांमध्ये फिरत्या पद्धतीने प्रदर्शन केले जाणार आहे.
76 देश यावेळी सहभागी झाले असून 300 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. देशभरातील प्रत्येक राज्याचा स्टॉल लावण्यात येणार आहे, असे सांगून सावंत म्हणाले, यावेळी कंट्री फोकसमध्ये रशिया आहे. महोत्सवात गोवा सरकार केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्या बरोबर सहआयोजक आहे. यासाठी केंद्र सरकार 22 कोटी तर गोवा सरकार 18 कोटी रुपये खर्च करणार आहेत.
यावेळी इफ्फी पहिल्यांदाच तिकीट विरहित करण्यात आला असून ऑनलाईन नोंदणीवर भर देण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर संध्याकाळी 6 वाजता कला अकादमीमध्ये 'डेस्पाईट द फॉग' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनस्थळी सकाळी 7 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे. 48 तासांपूर्वी कोणत्याही चित्रपटाची नोंदणी करता येईल. दरम्यान, काही कलाकृतींवर शेवटचा हात फिरविण्यावर कलाकार व्यस्त आहेत.