पणजी - उत्तर गोव्यातील शिवोली परिसरात शापोरा नदीत नांगरलेली (उभी असलेली) हाऊसबोट आगीत जळून खाक झाली आहे. यामुळे सुमारे 50 लाखांचे नुकसान झाले आहे. पेडणे आणि म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठ्या शर्थीने पाण्याबरोबर वाहत जाणाऱ्या या बोटीवरील आग विझवली.
पर्यटन हंगामात पर्यटकांना आरामदायी जलसफर घडवून आणण्यासाठी शापोरा नदीत हाऊसबोट सेवा देत असतात. पावसाळ्यात अशा बोटी नांगरून ठेवल्या जातात. मोहित अग्रवाल आणि सुलेख अग्रवाल यांच्या मालकीची सदर बोट नादूरुस्त असल्याने शापोरा नदीत नांगरून ठेवली होती.
हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ, खड्डेमय रस्त्यामुळे वेग मंदावला
पेडणे अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोटीला आग लागल्याची माहिती पेडणे अग्निशामक दलाला मिळताच पेडणे अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत बोटीने पूर्णपणे पेट घेतला होता. त्यामुळे प्रथम पुलावरून पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नांगरलेला दोरखंड जळाल्यामुळे बोट प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागली. त्यामुळे स्थानिकांच्या दोन बोटींच्या साहाय्याने बोटीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यासाठी पेडणे आणि म्हापसा येथील अग्निशामक दलाकडील फ्लोटींग पंपचा वापर करत पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्यात आली. तोपर्यंत बोट वाहत मोरजी_खिंडपर्यंत पोहोचली होती.
हेही वाचा - गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर भाज्यांचे वाढते दर सरकारने ठेवावे नियंत्रणात - दिगंबर कामत
पेडणे अग्निशामक दलाचे स्टेशन फायर ऑफिसर नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रेमानंद कांबळी, विष्णुदत परब, शैलेश हळदणकर, जे. बी. मुळीक तर म्हापसा अग्निशामक दलाचे ज्ञानेश्वर सावंत, प्रमोद महाले, गिरीश गावस हे जवान सहभागी झाले होते.
हेही वाचा - मुंबईत अजगराने केली शेळीची शिकार; पाहा थरारक व्हिडिओ
आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तसेच नेमके किती नुकसान झाले हे कळलेले नाही. परंतु, 50 लाखांच्या आसपास नुकसान झाल्याची शक्यता आहे.