पणजी - जुन्या गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर यांना 'गोंयच्या सायब' म्हणून जगभरात ओळखले जाते. दरवर्षी तीन डिसेंबर या दिवशी येथील फेस्त देशविदेशातील लोकांच्या उपस्थितीत साजरे केले जाते. परंतु, यावर्षी महामारीच्या पार्श्वभूमीवर आज प्रातिनिधिक लोकांच्या उपस्थितीत साजरे करण्यात आले.
या फेस्तची नुवेना (प्रार्थना) आठवडाभर आधीपासून सुरू असतात. यासाठी गोवा आणि परिसरातील भाविक पायी चालत फेस्तच्या पूर्वसंध्येपर्यंत चर्च परिसरात दाखल होतात. परंतु, महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गर्दी होणार नाही, याची काळजी घेत, फेस्त काही निवडक प्रतिनिधींच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता. तसेच लोकांना येथील प्रार्थनांचे लाइव्ह दर्शन देण्याची व्यवस्था चर्च व्यवस्थापनाने केली आहे. आज सकाळी नुवेन्हा झाल्यानंतर माजी आर्च बिशप फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यासाठी गोव्यातील विविध चर्चचे प्रतिनिधी भाविक उपस्थित होते.
गोव्याच्या एकतेचे प्रतीक : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोंयचचो सायबचे फेस्त हे गोव्यातील समृद्ध सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अनेक बंधने आली आहेत. त्यामुळे भाविकांना इच्छा असूनही नुवोन्हांना उपस्थित राहता आले नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले.