पणजी - जेव्हा जेव्हा गोव्यात निवडणुका येतात तेव्हा भाजपकडून खाण सुरू करण्याचे आश्वासन दिले जाते. हा खोटारडेपणा भाजपने बंद करावा. सध्या मरणासन्न अवस्थेत असलेले गोवा भाजप ' व्हेंटिलेटरवर' आहे. याचा निर्णय २३ मे रोजी होणार आहे, अशी टीका गोवा सुरक्षा मंचचे ज्येष्ठ उपाध्यक्ष किरण नाईक यांनी केली आहे. तसेच पणजीवासीयांनी विचारपूर्वक मतदान करून गोसुमंच्या सुभाष वेलिंगकर यांच्या सारख्या चारित्र्यवान उमेदवाराला निवडणून द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गोसुमं प्रचार कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाध्यक्ष आत्माराम गांवकर, अँड. ह्रदरनाथ मंगेशकर, शैलेंद्र वेलिंगकर, महेश म्हांबरे, सुनील सांतिनेजकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना नाईक म्हणाले की, पणजीतील कॅसिनो भाजप हटवू शकत नाही. कारण तेथील काही कामे भाजपवाल्यांना मिळतात, असा आरोप गोवा सुरक्षा मंचने केला आहे. तसेच गोवा सुरक्षा मंचच हे कॅसिनो हटवू शकतात, असा विश्वासही गोसुमंचे ज्येष्ठ उपाध्यक्ष किरण नाईक यांनी व्यक्त केला आहे. पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार कसा भ्रष्टाचारी आहे, हे सांगणे आमचे कर्तव्य आहे. पणजीसाठी गोसुमं काय करेल हे पुढील काळात समजून येईल, असेही ते यावेळी म्हणाले.