पणजी - गोवा बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून 92.47 टक्के एवढा निकाल लागला आहे. यात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. एका विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी १४ जून रोजी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
पर्वरी येथील शिक्षण विभागाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत गोवा बोर्डाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी दहावीच्या निकालाची घोषणा केली. यावेळी मंडळाचे सचिन भगिरथ शेट्ये उपस्थित होते.
मार्च-एप्रिल २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी १८ हजार ६८४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी मधील १७ हजार २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले. यामध्ये ९ हजार ४६० मुलींपैकी ८ हजार ७७२ (९२.६२टक्के) तर ९ हजार २२४ मुलांपैकी ८ हजार ५०६ (९२.३१ टक्के) उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी ७ हजार १२२ विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळाले असून त्यामुळे २७९ विद्यार्थी (१.६४ टक्के) उत्तीर्ण झाले.
राज्यातील बार्देश १०, डिचोली ९, कणकोण ९, मुरगाव ४, पेडणे १२, फोंडा १३, केपे ३, सासष्टी १५, सांगे ५, सत्तरी ७, तिसवाडी १० आणि धारबांदोडा ५, या तालुक्यांतील एकूण ९८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून १४ जूनला पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी २५ मे ते १ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना एका ओळीचा अर्ज सादर करता येणार आहे. ही परीक्षा प्रत्येक तालुक्यातील एका केंद्रावर घेतली जाणार आहे.