पणजी - केंद्रातील भाजप सरकार गोव्याला गृहीत धरून कर्नाटकशी पत्रव्यवहार करत आहे. सरकार न्यायालयाचा अवमान करत असून, म्हादई प्रकरणी गोवा सरकारने विशेष अधिवेशन बोलावून एकमुखी ठराव घेतला पाहिजे. तसेच आवश्यकता भासल्यास पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी करता येईल, अशी मागणी गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गुरुवारी केली. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत कामत बोलत होते.
हेही वाचा - 'देशाच्या इतिहासातील वाईट काळ, स्थापनादिनी काँग्रेस काढणार संविधान बचाव रॅली'
कामत म्हणाले, "म्हादई लवादाने निवाडा दिल्यानंतरही महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक ही तिन्ही राज्ये न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे कर्नाटकशी केंद्राचा व्यवहार हा न्यायालयाचा भंग नव्हे काय? तसेच या माध्यमातून केंद्र गोव्यावर अन्याय करत असून. संभ्रम निर्माण करत आहे. यावरून केंद्र सरकारला गोव्याशी काही देणेघेणे नाही असचा होतो." असा आरोपही कामत यांनी केला.
म्हादई आंदोलनाचा परिणाम पर्यटनावर होत असल्याचा आरोप या क्षेत्रातील व्यावसायिकांकडून केला जात आहे, याकडे आपण कसे पाहता, असे विचारले असता कामत म्हणाले, म्हादई राहिली तर गोवा राहणार आहे. आमचा लढा हा गोवा वाचविण्यासाठी आहे.
भाजपाकडून राजकारणासाठी गोव्याचा बळी - चोडणकर
गोवा काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, भाजप आपल्या स्वार्थी राजकारणासाठी गोव्याचा वापर करत आहे. यासाठी ते गोव्याचा बळी देत आहे. याचा काँग्रेस निषेध करत आहे. सरकारचा पत्रव्यवहार कर्नाटकच्या बाजूचा दिसत आहे. म्हादईचा प्रश्न सोडविण्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. कारण त्यांच्या धोरणाने लोक त्रासले आहेत, ज्यामुळे ते त्यांना भविष्यात सार्वजनिक कार्यक्रमातही सहभागी होऊ देणार नाहीत, असे चित्र दिसते.
गोव्यातील घटत्या पर्यटकांच्या संख्येविषयी बोलताना चोडणकर म्हणाले, गोव्यातील पर्यटक कमी होण्यासाठी अनेक कारणे आहेत. ज्यामध्ये केंद्र सरकारचे चुकीचे आर्थिक धोरण आहे. तसेच गोवा सरकारकडे योग्य असे, पर्यटन धोरणही नाही. तसेच पर्यटकांना वाचवण्यासाठी जीवरक्षक नाहीत, पर्यटन खात्यातील भ्रष्टाचार या सर्वांचा एकत्रित परिणाम गोव्याच्या पर्यटनावर होत आहे.
दरम्यान, शनिवारी (दि. 28) काँग्रेसने पुकारलेल्या 'भारत वाचवा संविधान वाचवा' आंदोलनात गोवा काँग्रेस सहभागी होणार असून पणजीतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यात येतील, असेही चोडणकर म्हणाले.
हेही वाचा - 'काँग्रेस, ओवेसी, तुकडे तुकडे गँग देशामध्ये गृहयुद्ध लावू इच्छिते'