पणजी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांत बदल करुन शिथीलता देण्यात आली आहे. यात राज्य सरकारने सोमवारपासून धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी गोव्यातील चर्च आणि मशिदींना आणखी काही काळ बंद राहण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे ही सोमवारपासून उघडता येतील, मात्र, कोरोनाबात खबरदारी म्हणून कुठल्याही प्रकारच्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रम, उत्सवांना परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले होते.
रविवारी गोवा चर्चच्या एका प्रवक्त्याने याबाबत स्पष्टीकरण दिले. कोरोना संसर्गाची सध्याची परिस्थिती पाहता सोमवारपासून चर्च उघडता येणार नाही. तसेच, त्याबाबत निर्णय घेण्यासाठी अजून काही काळ थांबण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. याबाबत सामाजिक संचार मिडीयासाठीचे डायोसीस सेंटरचे निर्देशक फादर बॅरी कोर्दाजो यांनी एक निवेदन जारी केले. यात त्यांनी 'सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यामुळे उपस्थित झालेल्या संकटाचे आकलन करणे सुरू आहे. त्यामुळे, आम्ही सोमवारपासून या प्रार्थनास्थळांना उघडण्याबाबत साशंक असल्याचे म्हणाले आहेत. त्यामुळे, आम्ही आपल्या पादरी आणि उपासकांना सूचित करतो कि सध्याची कोरोनास्थीती पाहता गिरीजाघरे ही उद्यापासून उघडू शकणार नाहीत' असे त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सध्याची परिस्थिती पाहता आम्ही मस्जिद आणि प्रार्थना स्थळांना राज्य शासनाच्या एसओपी (प्रमाणित कार्यप्रणाली) च्या अनुषंगाने सतर्क राहून विवेकतेने आणि सावधगिरीने उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळजवळ ३० टक्के कॅथोलिक लोकसंख्या असलेल्या किनारपट्टीवरील चर्च बंद आहेत. तेव्हापासून, बरेचसे पादरी भाविकांना ऑनलाईन संबोधित करत आहेत. तर, यावेळेसचे ईस्टरसह दुसरे उत्सवदेखील कोरोनाबाबतची खबरदारी म्हणून एकत्रितपणे साजरे न करता घरातच साजरे करण्यात आले.
दुसरीकडे, राज्यातील कोरोनाची स्थिती बघता ऑल गोवा मुस्लिम जमात असोशिएशननेही मशीदी सूरू करण्यास ३० जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. याबाबत बोलताना असोशिएशनचे अध्यक्ष बशीर शेख म्हणाले, १ जूनपासून गोव्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या एका आठवड्यात जवळपास १९६ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच, असोसिएशन ऑफ ऑल गोवा मुस्लिम जमातच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी समुदाय आणि सदस्यांच्या सुरक्षेसाठी 30 जूनपर्यंत गोव्यातील सर्व मशिदी सुरू करण्यास उशीर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
यासोबतच, गोव्यातील सर्व मशीदीतील सल्लागार आणि सदस्यांना विनंती करत कोरोनाची झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या पाहता याचा समूह संसर्ग होऊ नये याबाबत खबरदारी म्हणून हा निर्देश जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांच्या प्रतिनिधींनी ज्यभरातील महत्वाची धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर आज बैठक घेतली. दरम्यान, शनिवारी राज्यात कोरोनाचे २६७ रुग्ण आढळून असून यातील २०२ हे अॅक्टीव्ह रुग्ण असल्याचे अधिकारिक आकड्यांवरून निष्पन्न झाले आहे.