पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीचे सर्व निकाल ( Goa Election Result 2022 ) हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपला 20 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 12 जागा मिळाल्या आहेत. तर इतर प्रमुख पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेसला 2 जागा मिळाल्यात. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती मात्र गोव्यात दारुण अशी झाल्याची दिसून आली.
गोव्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सुरुवातीच्या काळात पिछेहाट झाल्याचे दिसून आले. काही काळ तर असे वाटले की त्यांचा पराभव होतो की काय. मात्र नंतर आकडे फिरले. प्रमोद सावंत विजयी झाले. त्यांनी सांकेलीम मतदारसंघातून विजयी पताका फडकवली. काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांचा त्यांनी पराभव केला. ते 650 मतांनी निवडून आले. त्यांनी विजयाची हॅटट्रिक केली.
दुसरीकडे काँग्रेसचे प्रमुख उमेदवार दिगंबर कामत मडगाव मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाचे उपमुख्यमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांचा पराभव केला आहे. दिगंबर कामत हे 7 हजार 760 मतांनी विजयी झाले. दिगंबर कामत राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा 711 मतांनी पराभव झाला आहे. भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालाय. पणजीमधून भाजपाचे बाबूश मोन्सेरात यांनी त्यांचा पराभव केला.
काँग्रेसचे कळंगुट मतदार संघाचे उमेदवार मायकल लोबे यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार जोसेफ सिक्वेरा यांचा पराभव केला. अगदी निवणुकीच्या तोंडावर लोबो यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेससाठी त्यांचा विजय महत्वाचा होता. गोव्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव आघाडीवर होते.
गोव्याच्या निवडणुकीत आणखी एक महत्वाचे नाव चर्चिल आलेमाओ त्यांनी तृणमूल पक्षाच्या तिकिटावर बेनालिम (Benaulim) मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाला. त्यांना आम आदमी पक्षाच्या वेंझी वेगास (Venzy Viegas) यांनी हरवले. तसेच विजय सरदेसाई (पक्ष- जीएफपी) फातोर्डा मतदारसंघातून दामू नाईक (भाजपा) यांचा त्यांनी पराभव केला.
मांद्रे मतदारसंघात मतदार संघात गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. ते अपक्ष म्हणून निवडूक लढले. त्यांचा मगोचे उमेदवार जीत आरोलकर यांनी पराभव केला. याठिकाणी भाजपा उमेदवार दयानंद सोपटे यांचाही पराजय झाला. सांताक्रूझ मतदारसंघात रुडॉल्फ फर्नांडिस (काँग्रेस) विजयी झाले. त्यांनी अंतोनियो फर्नांडिस (भाजपा) आणि अमित पालेकर (आप) यांचा पराभव केला.
उत्तर गोव्यातील वाळपई मतदार संघातून भाजपचे उमेदवार विश्वजीत राणे विजयी झाले आहेत. त्यांनी रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीच्या तुकाराम (मनोज) परब यांचा पराभव केला. राणे हे 2017 ला काँग्रेस च्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र महिनाभरात त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पुन्हा विजय झाला व पुढे ते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री झाले होते. सिओलिम मतदारसंघात भाजपचे प्रतिष्ठित उमेदवार दयानंद मांद्रेकर यांचा पराभव झाला आहे. त्यांचा पराभव काँग्रेसच्या दिलायला लोबो यांनी केलाय.
हेही वाचा - Goa Assembly Election 2022 Result : गोव्यात भाजपने मारली बाजी.. पाहा संपूर्ण निकाल.. कोण विजयी? कोण पराभूत?