पणजी - गोव्यात चित्रपट सृष्टी उभारणे सरकारचे काम नाही. परंतु, कलाकारांनी उभारण्यासाठी प्रयत्न केला तर सरकार निश्चितच सहकार्य करेल, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
विन्सन वर्ल्डतर्फे कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, चित्रपट निर्माते सुभाष घई, विन्सन वर्ल्डचे संचालक संजय शेटये, श्रीपाद शेटये आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. सावंत म्हणाले, "गोव्यात खाण, पर्यटन उद्योगानंतर चित्रपट सृष्टी हा रोजगार निर्माण करणारा व्यवसाय ठरू शकतो. यासाठी गोव्याशी निगडीत कलाकार आहेत त्यांनी प्रयत्न सुरू केल्यास त्यांना आवश्यक सहकार्य गोवा सरकार करेल."
यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांना डॉ. सावंत यांच्या हस्ते ' कृतज्ञता' पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी बॉलिवूड निर्मिता सुभाष घई यांच्या 'विजेता' या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपट सृष्टीतील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.