पणजी - गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षांनिमित्त राज्य सरकारने वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गोव्याचा इतिहास जनतेसमोर मांडण्याचा संकल्प केला आहे. याची सुरुवात शनिवारी (दि.19) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाने होणार आहे. यासाठीच्या बोधचिन्हाचे अनावरण आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रयाविषयी माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी आल्तिनो पणजी येथील महालक्ष्मी निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना डॉ. सावंत म्हणाले, हिरक महोत्सवी वर्षात केवळ सादरीकरण होणार नाही. तर मागील 60 वर्षांत काय प्राप्त केले आणि पुढील 60 वर्षांत काय साध्य करायला हवे, त्याविषयी दृष्टीकोन आणि नियोजन करण्याचे वर्ष म्हणून पाहत आहोत. वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गोव्याचा इतिहास नव्या पिढीसमोर ठेवला जाणार आहे. अभ्यासक्रमात इतिहास सामावून घेण्याचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
कार्यक्रमाची सविस्तर माहिती देताना डॉ. सावंत म्हणाले, सकाळी ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर दुपारी राष्ट्रपतींचे दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरने गोवा विद्यापीठ येथील हेलिपॅड येथे उतरून राजभवनात जातील. त्यानंतर संध्याकाळी पणजी शहरातील आझाद मैदानावरील शहीद स्मारकांवर पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर मुख्य सोहळा होणार आहे. यावेळी गोव्यातील 12 तालुक्यातील सुमारे 200 कलाकारांचा सहभाग असलेला ' गोंयचो गाज' हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती आपल्या कुटुंबियांसमवेत खाजगी भेटी देतील आणि संध्याकाळी दिल्लीकरीता रवाना होतील.
गोवा मुक्ती कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपती पहिल्यांदाच प्रमुख पाहुणे
राष्ट्रपतींचे आगमन आणि हिरक महोत्सवी कार्यक्रयासाठी सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहे. तो थांबवावा अशी मागणी करणारी पत्रे तथा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी होणारा अपप्रचारात थांबवावा, यामध्ये राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा याकरिता काही संस्था, संघटनांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहिली आहेत. त्यावर निशाणा साधताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राष्ट्रवादी नागरिक राष्ट्रपतींचे स्वागत करतील. कारण, गोवा मुक्ती कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपती पहिल्यांदाच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु, कोविड महामारीचा विचार करता मर्यादित लोकांना प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी प्रवेश दिला जाणार आहे. तर गोमंतकीय जनतेला याचा आस्वाद घेता यावा यासाठी व्हर्च्युअल प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
भावेश वेलिंगकरचे बोधचिन्ह सर्वोत्कृष्ट
हिरक महोत्सवी कार्यक्रमासाठी वर्षभर उपयोगात आणण्यासाठी राज्य सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने बोधचिन्ह स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये मैत्रेय देसाई (म्हापसा), दत्तेश डांगी (कुडचडे) आणि भावेश वेलींगकर (वेलींग) या तिघांनी रेखाटलेली बोधचिन्हे सरस ठरली. त्यामधील वेलींगकर यांनी रेखाटलेले बोधचिन्ह निवडण्यात आले. ज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. विजेत्याला रोख रुपये 10 हजार आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.