पणजी - गोव्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. मात्र, अशातही खबरदारी म्हणून लोकांनी गर्दी टाळणे आवश्यक आहे. याच कारणामुळे गोव्यातील नागरिकांनाही घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले होते. अशातही लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने गोव्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबतची घोषणा केली.
आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत गोव्यात संचारबंदी असणार आहे. प्रमुख विरोधी पक्षांसह गोव्यात कार्यरत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. ज्यामध्ये सर्वांनी या लढाईत गोवा सरकारला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा - COVID-19 LIVE : आवश्यक असेल तिथे कर्फ्यू लागू करा, केंद्राचे राज्यांना निर्देश..
यावेळी बोलताना डॉ. सावंत म्हणाले, विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी काहींना घरीच क्वारेंटाईन केले आहे. त्यांच्या संपर्कात कोणी येऊ नये याकरिता आज मध्यरात्रीपासून गोव्यात कर्फ्यू लागू करण्यात येईल. ज्यामुळे सर्वच व्यवहार थांबवले जातील. कोरोना विरुद्धच्या या लढाईसाठी राज्य सरकारला आर्थिक मदत म्हणून सर्व मंत्र्यांनी एका महिन्याचा पगार देण्याचे जाहीर केले आहे. त्याबरोबरच सुवर्णा बांदेकर या उद्योजकिने 15 लाख रूपयांचा धनादेश राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे. तर राज्यातील अन्य उद्योजकांनी मदत देण्याची घोषणा केली आहे, असे सावंत यांनी सांगितले.
सावंत म्हणाले, गोवा सरकारने 60 हून अधिक व्हेंटीलीटर मागवले आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालयही उपयोगात आणले जातील. त्याबरोबरच बाह्य रुग्ण विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या काळात लोकांना अत्यावश्यक सेवा मिळाव्यात याकरता सरकार एक यंत्रणा राबविणार आहे. लोकांनी याचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि गरजेशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच, ज्या औषध निर्माता कंपनींमध्ये बाहेरील राज्यातील कामगार येत आहेत, ते बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत. तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वेगळी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांनी या बंदला 100 टक्के सहकार्य करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
हेही वाचा - #Corona : राज्यात कोरोनाचा तिसरा बळी, 64 वर्षीय वृद्धाचा मुंबईत मृत्यू