पणजी - गोव्यात सोमवारपासून काही अटी आणि शर्थीवर आर्थिक घडामोंडीना सुरुवात होईल. परंतु, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक असेल. पुढील नियोजन काय असेल हे पंतप्रधानांशी होणाऱ्या व्हिडिओ कॉन्स्फरन्सिंग नंतरच स्पष्ट होणार आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज व्हिडिओ कॉन्स्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
डॉ. सावंत म्हणाले, मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी पंचायत स्तरावर परवानगी दिली जात आहे. त्यामुळे ज्यांच्या घरांची दुरुस्ती अथवा अपुरे बांधकाम पूर्ण करता येईल. लॉकडाऊन असताना सार्वजनिक वाहतूक सुरू असताना 150 बसेसमधून केवळ सरकारी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांना प्रवास करता येईल. तसेच आवश्यक ठिकाणी फेरीसेवा सुरू केली आहे. मात्र, सध्या इपिडेमिक कायद्याबरोबरच 144 कलम कायम आहे. किराणा मालाच्या दुकानांना सुरू करण्यास परवानगी दिली असरी तरीही मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, सलून आणि पार्लर, दारू दुकाने आणि दारुशी संबंधित घडामोडी आदी बंदच राहतील. जेवढी सांगितली तेवढीच दुकाने सुरू राहतील. एखाद्या दुकानदारास शंखा असेल तर त्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी, असे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले, परंतु सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. ज्या दुकानांकडून याचे उल्लंघन होईल, त्यांना दि. 3 मेपर्यंत दुकान बंद ठेवावे लागेल.
गोव्यात आणल्या गेलेल्या खलाशांच्या विलगीकरणाचा खर्च त्यांचे जहाज मालक करतील. परंतु, सध्या ज्यांना आणले ते सर्व भारतीय सागरी हद्दीतील आहेत. तर विदेशात असलेल्या खलाशांना आणि विद्यार्थी, कामगारांना गोव्यात परत आणण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. जे गोमंतकीय विद्यार्थी इतर राज्यांत आहेत, त्यांना जर गोव्यात परतावे, असे वाटत असेल तर त्यांनी रविवारपर्यंत अर्ज सादर करावेत. गोमंतकीयांना पुरेसे दूध उपलब्ध व्हावे, यासाठी परराज्यातील दूध वाहतूक टँकरना परवानगी दिली जाणार आहे.
रमजानसाठी मुख्यमंत्र्यांनी मुस्लीम धर्मियांना शुभेच्छा दिल्या. तसेच याकाळात आवश्यक सामान खरेदीसाठी गर्दी न करता 'ग्रोसरी ऑन व्हील'चा लाभ घ्यावा. लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यासाठी आतापर्यंत गोव्यातून 33 विशेष विमान उड्डाणे करण्यात आली आहेत. ज्यामधून 5933 विदेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्यात आले आहे, असे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले, अबकारी खात्याने आतापर्यंत 3 लाख 77 हजार लिटर सँनिटायझर तयार केले आहे.