गोवा (पणजी) - खा, प्या, मजा असा संदेश देणाऱ्या किंग मोमो च्या राजवटीला राज्यात शनिवारपासून प्रारंभ झाला. राजधानी पणजीत शनिवारी कार्निवल मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत विविध विषयांवर आधारित, जनजागृती करणारे, संदेश देणारे चित्ररथ तसेच आकर्षक वेशभूषा केलेले कलाकार सहभागी झाले होते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून मरगळ आलेल्या या महोत्सवाला यंदा मात्र महामारी नियंत्रणात आल्यामुळे भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले. देशी विदेशी पर्यटकांबरोबर गोमंतकीयांनीही मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला होता.
चार दिवस चालणार हा कार्निवल - पुढच्या चार दिवसांत गोव्यातील विविध शहरात या कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी राजधानी पणजीतून याची सुरुवात झाली असून म्हापसा, वास्को आणि मडगाव या मुख्य शहरात या कार्निवलची धूम पाहायला मिळणार आहे.
गोव्यातील निसर्गावर भाष्य - वाढत्या नागरीकरणामुळे गोव्यातील नैसर्गिक संपदा लुप्त होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गोव्याचा समृध्द असा निसर्ग वाचविणे ही काळाची गरज आहे. यासाठी जनजागृती करण्यासाठी विविध चित्ररथ या कार्निवलमध्ये सहभागी झाले होते. त्यातून गोवा आणि गोव्याचा निसर्ग वाचवूया, असा संदेश देण्यात आले आहेत.
देशी विदेश पर्यटकांची मोठी गर्दी - कार्निवल महोत्सवात देशी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, केरळ, आंध्रप्रदेश तसेच उत्तर भारतातून गोव्यात आलेल्या पर्यटकांनी प्रामुख्याने हजेरी लावली होती. अनेक पर्यटकांनी सेल्फी काढत, गात तसेच रंगाची उधळण करत आनंद लुटला.