पणजी - गोवा ऑलिम्पिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी असलेले गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राजीनामा दिल्यास गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धा वेळीत आयोजित करण्यास मदत होईल, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी गोव्याचे क्रीडा मंत्री मनोहर आजगावकर यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून चोडणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच स्पर्धा सुरळीतपणे आयोजित होण्यासाठी मंत्र्यानीही राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा - गोव्याला लुटणाऱ्या 'या' खात्याचा ताबा मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घ्यावा, काँग्रेसची मागणी
चोडणकर यांनी शुक्रवारी गोवा ऑलिम्पिक संघटना अध्यक्ष यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की आपण जर राजीनामा दिला तर गोव्यात 2020 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धा सुरळीतपणे पार पाडता येतील, असे म्हणत क्रीडा मंत्र्यांनी आपल्या राजीनाम्याची मागणी केली होती. खरे तर क्रीडा मंत्री मनोहर आजगावकर सदर खाते सांभाळण्यात अयशस्वी ठरले आहेत. राज्याच्या हितासाठी मी नेहमीच खेळाडूवृत्ती दाखवत आलो आहे. गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वेळीत आयोजन्यात सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे वारंवार स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी करावी लागत आहे. राज्याचा नावलौकिक खराब होत आहे. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातील भ्रष्टाचार पाहता क्रीडा मंत्री आजगावकर यांनीही राजीनामा दिला पाहिजे, असे चोडणकर म्हणाले.
या स्पर्धेसाठीच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी, क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय आणि गोवा फुटबॉल विकास मंडळावर क्रीडा मंत्र्यांनी खेळाशी संलग्न असलेल्या योग्य व्यक्तीला संधी न देता स्वतःच्या भावाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे यामधील भ्रष्टाचाराची चौकशी गोवा ऑलिम्पिक संघटनेने करावी, अशी मागणीही चोडणकर यांनी केली आहे. दरम्यान, आपल्याला वर्षभरापूर्वी गोवा ऑलिम्पिक संघटना उपाध्यक्ष म्हणून निवडून दिलेल्या सर्वांचे आभार मानले. तसेच आपल्या सहकार्याची गरज भासल्यास आपण सदैव तत्पर राहणार आहे, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.