पणजी - भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर ( BJP First Candidate List ) केल्यानंतर नाराज उमेदवारांनी बंडखोरीची भूमिका घेतली आहे. काही प्रस्थापितांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपाचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर ( Laxmikant Parsekar ) यांना मांद्रे मतदारसंघातून ( Mandre Constituency ) भाजपाने उमेदवारी नाकारली. तसेच भाजपाच्या महिला उपाध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर ( Savitri Kavalekar ) यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे नाराज कवळेकर यांनी 33 कार्यकर्त्यांसह भाजपाच्या सामुहिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.
आयारामांना संधी -
लक्ष्मीकांत पार्सेकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. 2017 च्या निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार दयानंद सोपटे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर सोपटे यांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून पार्सेकर विरूद्ध सोपटे यांचे शीतयुद्ध सुरू होते. मांद्रे मतदारसंघातून संधी मिळेल अशी पार्सेकर यांना अपेक्षा होती. मात्र भाजपा नेतृत्वाने भाजपावासी झालेले दयानंद सोपटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने पार्सेकर नाराज झाले आहे. भाजपाने पार्सेकर यांच्यावर निवडणूकीसंदर्भात विविध जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. मात्र पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांची मागणी म्हणून दोन दिवसात भाजपाचा राजीनामा देऊन आपण निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सावित्री कवळेकर अपक्ष लढणार -
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची पत्नी आणि भाजपाच्या महिला उपाध्यक्षा सावित्री कवळेकर यांना देखील भाजपाने तिकीट नाकारली आहे. त्यांच्याजागी सुभाष फळदेसाई यांना संधी देण्यात आली. उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊनही पक्षाने आपला विश्वासघात केला असल्याचा आरोप करत अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा त्यांनी पत्रकारपरिषदेत केली आहे. तसेच 33 कार्यकर्त्यांसह भाजपाच्या सदस्यत्वाचा सामुहिक राजीनामा दिलेला आहे. सावित्री कवळेकर यांच्या बंडाच्या इशाऱ्याने ( Rebel Candidates ) भाजपाची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे.