पणजी - गोव्याची राजधानी पणजी शहरापासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या खोर्ली-म्हापसा येथील एका सदनिकेत आज सकाळी एकाच कुटुंबातील चौघेजण मृतावस्थेत आढळले. यामध्ये पती पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.
याप्रकरणी उत्तर गोवा पोलीस उपअधीक्षक एडविन कुलासो यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हापसा पोलिसांना आज सकाळी दहाच्या सुमारास साहु धुमाळे (41), कविता धुमाळे (34), त्यांचा मुलगा पारस (9) आणि साईराज (अडीच वर्षे) यांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले. यामधील साहू यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत, तर अन्य तिघे शयनगृहात फरशीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आले. म्हापसा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद करत, मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत.
घटनास्थळी पोलिसांना चिट्ठी आढळून आली आहे. परंतु, त्यातील मजकूर जाहीर करता येणार नाही. गरज वाटल्यास त्यादिशेनेही तपास करण्यात येईल, असे कुलासो यांनी सांगितले. चिट्ठीमध्ये हा निर्णय का घेतला याची माहिती असल्याचे संकेतही त्यांनी दिले. मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्यामुळे, तिघांचा मृत्यू नेमका कसा झाला हे आताच सांगता येणार नाही. शवविच्छेदन अहवालानंतर ते स्पष्ट होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, धुमाळे कुटुंबीय मागील अनेक वर्षे गोव्यात राहत आहेत. ते मुळचे नेसरी-गडहिंग्लज (कोल्हापूर) येथील आहेत. ते एका खासगी सुरक्षारक्षक कंपनीत चांगल्या पदावर काम करत होते. त्यामुळे त्यांनी अचानक असा निर्णय का घेतला असावा याबाबत शेजाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी परिसरातील नागरिकांनी इमारतीच्या आवारात मोठी गर्दी केली होती.