पणजी - वयामुळे व्यवहार करताना ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. याचा फायदा घेत फसवणूक केली जाते. या विषयी जागृती करण्यासाठी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने नुकताच कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आल्तिनो-पणजी येथील गोवा इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित कार्यक्रमात राज्यभरातील विविध पोलीस स्थानकांमध्ये नोंदणी असलेले दोनशेहून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश जॉब, आयसीआयसीआय बँकेचे सायबर तज्ञ सुमित महाबळेश्वरकर, पोलीस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण शाखा) पंकजकुमार (आयपीएस) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पोलीस महानिरीक्षक (गुन्हे) परमादित्य (आयपीएस) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सायबर गुन्हे कशा प्रकारे घडतात याविषयी जागृती करताना ते कसे सोडवले जाऊ शकतात याविषयी मार्गदर्शन केले. सायबर विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करताना, अशा प्रकारचा उपक्रम अन्य समाज घटकांसाठी आयोजित करण्यात यावा, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच काही प्रात्यक्षिके सादर केलीत. यावेळी सुमारे 200 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यांनी अशा उपक्रमाबद्दल पोलिसांचे धन्यवाद मानत तालुका स्तरावर असा उपक्रम राबवावा, अशी इच्छा व्यक्त केली.