पणजी : गोव्यात सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यातील एकाला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सरकारी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर अन्य सहा रुग्णांची तब्येत सुधारत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज महालक्ष्मी निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सावंत म्हणाले, लॉकडाऊन 14 एप्रिलला संपत असले तरीही लोकांनी घरीच रहावे. त्यानंतर त्याचे स्वरूप कसे असेल याबाबत 13 एप्रिलला जाहीर केले जाईल. लोकांनी सामाजिक अंतराचे कटाक्षाने पालन करावे. सरकारी यंत्रणा सर्वत्र लक्ष ठेवून आहे. गोव्यात कोणालाही सध्या प्रवेश करता येणाय नाही. रेल्वे रुळावरही लक्ष ठेवण्यात येत आहेत.
परिस्थितीचा विचार करत राज्य सरकारने ग्रामपंचायत संचालनालयाद्वारे ग्रामपंचायतींना मॉन्सूनपूर्व कामाना परवानगी देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गवर लक्ष ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग आणि महानगरपालिका यांना सूचना देण्यात आली आहे. गोव्यात दि. 3 एप्रिलला शेवटचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यानंतर सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तरीही 17 एप्रिल पर्यंत होम क्वारंटाईन रुग्णांवर लक्ष असणार आहे.
लोकांनी सरकारने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, सरकार करत असलेल्या सामाजिक सर्व्हबाबत लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. या माध्यमातून लोकजागृती करण्यात येणार आहे. याकामासाठी एएनएम, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक आणि बूथस्तरीय अधिकारी यांचा समावेश असेल. सरसकट चाचणी करण्याची गरज नाही. केवळ ज्या परिसरात या विषाणू सद्रुष्य लक्षणे आढळतील तेथील चाचणी केल्या जातील. लोकांनी या सर्व्हेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात सध्या पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध आहेत. मास्क घरी बनविताना धुता येईल, असा बनवावा, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, एका कंपनीने आज 70 हजार लिटर सँनिटायझर तयार केले आहे. त्यापैकी 20 हजार गोवा सरकारला दिले आहे. खलाशांना गोव्यात आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. सध्या गोव्याच्या मुरगाव बंदरात एकाही खलाशांना उतरून घेतलेले नाही. केंद्राच्या निर्णयानंतर संबंधित खलाशांना प्रवेश दिला जाईल. परंतु, तत्पूर्वी बंदरावरच क्वारंटाईन केले जाईल. गोव्यात प्रवेश केल्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात येईल. यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब केला जाईल, असही मुख्यमंत्री म्हणाले.
लोकजागृती करिता आयुर्गोवा कोविड 19 अँपगोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि गोवा आयुर्वेदिक मेडिसिन प्रॅक्टिशनर्स संघटनेच्या सहकार्याने आज 'आयुर्गोवा कोविड 19 ' या अँपचे अनावरण करण्यात आले. या माध्यमातून लोकांमध्ये जागृती आणि रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढविवी याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. सोबत कोविड १९ विषयी आयुर्वेदिक माहिती आणि जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर याविषयी माहिती आहे. लोकांना आयुर्वेदिक सल्लाही उपलब्ध करून दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.