पणजी (गोवा) - कोरोनामुळे गोवा राज्यात आणखी ३१ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा २,२२८ झाला आहे. गेल्या चोवीस तासात १,२०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर सोबतच २,१६० जणांनी कोरोनावर मात केल्याने राज्याचा बरे होण्याचा दर ८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या राज्यव्यापी कर्फ्यू संदर्भात येत्या शनिवारी निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.
एकूण मृतांचा आकडा २,२२८ वर
गेल्या काही दिवसात राज्यात दिवसभरात कोरोना मृतांचा आकडा ४० पेक्षा जास्त होता. पण बुधवारी तो ३१ वर आला आहे. तर बाधितांचा आकडा घटत चालल्याने आणि बरे होण्याचा दर वाढत असल्याने सरकार, प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांतील चिंता काहीअंशी कमी झाली आहे. सक्रिय बाधितांची संख्या २२ हजार ९६४ पर्यंत आली आहे. राज्यात सुरुवातीपासून आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३९ हजार ९८५ झाली असून, त्यातील १ लाख १४ हजार ७९३ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केल्याची माहिती आरोग्य खात्याने दैनंदिन अहवालातून दिली आहे. दरम्यान, नव्या ३१ मृतांत ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या, २४ तासांत उपचारांसाठी आलेल्या आणि कोविड लसीचा पहिला डोस घेतलेल्या प्रत्येकी चौघांचा समावेश आहे, असेही आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.
'कर्फ्यू वाढवण्याबाबत शनिवारी निर्णय'
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या राज्यव्यापी कर्फ्यूसंदर्भात येत्या शनिवारी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला जाईल. त्यानंतरच कर्फ्यूचा कालावधी वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तर मंत्री मायकल लोबो आणि गोविंद गावडे यांनी कर्फ्यू कालावधी ३१ मेपर्यंत वाढवणे गरजेचे असून, त्यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा - 'बार्ज पी३०५' वरील ३७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले; १८८ जणांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरुच..
हेही वाचा - मोदी तर दिलदार नेते, महाराष्ट्रालाही १५०० कोटी रुपये देतील - संजय राऊत