पणजी- संविधानाने अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांना दिलेले अधिकार नाकारण्याचे भाजपचे धोरण आहे. असा आरोप करीत याचा विरोध करण्याकरिता काँग्रेस देशभर निदर्शने करत आहे. ज्या कारणांसाठी आरक्षण देण्यात आले होते त्याची मागील 70 वर्षांत योग्य अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आरक्षणाचे लाभार्थी आवश्यक सुविधांपासून आजही वंचित आहेत, असे मत गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा- चलनाचे अवमूल्यन! डॉलरच्या तुलनेत २६ पैशांच्या घसरणीनंतर रुपया ७१.८० वर
सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने पणजीतील आझाद मैदानावर आज निदर्शने केली. यामध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो यांच्यासह प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी सरकारचा हा निर्णय अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्या हिताआड येणारा कसा आहे, आरक्षण का देण्यात आले होते यावर भाष्य केले.
यावेळी बोलताना चोडणकर म्हणाले की, भाजपच्या छुप्या अजेंड्याचा विरोध करण्यासाठी ही निदर्शने आहेत. भाजप सरकारने चुकीची माहिती दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निवाड्यात आरक्षण हा मूलभूत अधिकार नसल्याचे म्हटले आहे. परंतु, भारतीय संविधानाने काही विशिष्ट कारणांमुळे हे आरक्षण दिले होते. मागील 70 वर्षांत याची योग्य अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे काही ठिकाणी लाभार्थ्यांना आजही आवश्यक आणि पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. ज्या कारणासाठी आरक्षण दिले ते पूर्ण झालेले नाही. अशावेळी सरकारच्या या धोरणाविरोधात जागृती करणार आहोत.
राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देणार आहोत. भाजपचा मनुस्मृतीवर विश्वास असला तरी आमचा भारतीय संविधानावर आहे.
दरम्यान, जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आमचे उमेदवार तयार आहेत. परंतु, भाजपला माहिती आहे की त्यांना गोव्यातील जनता स्विकारणार नाही. त्यामुळे ते निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळेच सरकारने अजूनही निवडणूक आरक्षण आणि कार्यक्रम जाहीर केलेला नाही, असा आरोपही चोडणकर यांनी केला.