पणजी - गोव्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे उपचारासाठी आवश्यक सुविधा सरकारने निर्माण केलेल्या आहेत. ज्यांना लक्षणे जाणवतात त्यांनी लवकरात लवकर रूग्णालयात जाऊन आवश्यक चाचण्या करून घ्याव्यात. कोरोनावर मात करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिकांना केले आहे. पणजीत एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नागरिकांनी सहकार्य करावे -
राज्यात कोरोना रूग्णांच्या सोयीसाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. आयसीयू युनिट वाढवणे, चाचणी आणि संक्रमण शोधणे, कोविड केअर सेंटर, होमायसोलेशन कीट आदी सुविधा तयार ठेवल्या आहेत. परंतु, वाढते संक्रमण रोखण्यासाठी ज्यांना थोडीफार लक्षणे जाणवतात रूग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे. असे केल्यास कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल, असे डॉ. सावंत म्हणाले.
नाईट कर्फ्यु, लॉकडाऊन हे पर्याय होऊ शकत नाहीत, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले. लॉकडाऊन केले तरीही मृत्यू दर कमी होणार नाही. त्यामुळे लक्षणे आढळल्यास लोकांनी लवकरात लवकर रूग्णालयात दाखल व्हावे. न घाबरता लसीकरण करून घ्यावे. तसेच मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करावा. सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे सावंत म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना कोविडची लागण झालेली आहे. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
गोव्यात एकाच दिवशी आढळले 927 नवीन रूग्ण -
गोव्यातील सक्रीय कोविड रूग्णांची आकडेवारी आता वेगाने वाढत आहे. एकाच दिवशी 3 हजार 189 लोकांची चाचणी केली. 927 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण सक्रीय कोविड रूग्णांची संख्या 6 हजार 321 झाली आहे. चोवीस तासात 282 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर 89.02 झाला आहे.
दरम्यान, टीका उत्सव सुरू झाल्यापासून सातव्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 11 हजार 476 नागरिकांनी लसिकरण करून घेतले आहे. यामध्ये पंचायत स्तरावर 5 हजार 342 जणांनी तर सरकारी आणि खाजगी रूग्णालयात मिळून 5 हजार 653 जणांनी लस टोचून घेतली आहे.