पणजी - मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो हलविण्यासाठी सरकार नव्या जागेचा शोध घेत आहे. तसेच नव्या जागेच्या निश्चितीनंतरच तेथील कॅसिनो हटविले जातील, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तर देवून दिली.
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी कॅसिनो मुद्दा उपस्थित करत म्हटले होते की, सरकारने गेमिंग कमीशन आणण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले. तसेच मांडवीतील कॅसिनो कधी हटविणार? त्यावर मुख्यमंत्र्यांनी सदर लेखी उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, कॅसिनो धोरण लवकरच निश्चित केले जाणार आहे. सरकार मांडवीतून कँसिनो हटवू पाहत आहे. परंतु आज घडीला आवश्यक जागा निश्चित झालेली नाही. एकदा जागा निश्चित झाल्यानंतर ते तात्काळ हटविले जातील.
मांडवीत सध्या 6 तरंगते कॅसिनो आहेत. तसेच ज्या कंपनीने कॅसिनो चालविण्यासाठी परवाना मागितला होता ते सर्व सुरू आहेत. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2014-15 मध्ये कॅसिनोद्वारे होणाऱ्या नदी प्रदूषणाचा अभ्यास केला होता. तसेच दर महिन्याला याची पाहणी करत असतात. तर याचवेळी जमिनीवर कॅसिनो असून त्याद्वारे सरकारला अलिकडे 1 एप्रिल ते 30 जून 2019 या तीन महिन्यात 55 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. तसेच 2018-19 या आर्थिक वर्षात 1 अब्ज 67 कोटी 86लाख 43 हजार 891 रुपयांचा महसूल मिळाला होता.