पणजी- गोव्यातील अठरा मतदारसंघांवर ओबीसी समाजातील भंडारी या जातीचा प्रभाव असल्याची चर्चा आहे. हीच बाब हेरून आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भंडारी समाजाचा उमेदवार मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करून नवीन गणित मांडली. त्यामुळे गोव्यातील निवडणूकही आता जातीय समीकरणावर लढवली जात असताना या अठरा मतदारसंघांमध्ये कोणत्या पक्षाने किती उमेदवार दिले हे पाहणं महत्त्वाच आहे.
या मतदारसंघांमध्ये आहे भंडारी समाजाचे प्राबल्य
गोव्यातील मांद्रे, शिरोडा, शिवोली, पोंडा, सालेगाव, मार्मुगोवा, दाभोली, म्हापसा, तालेगाव,मये,वापई, कांडकोर, मडकई, सांगेई, कुठाळी, पेडणे,सावर्डे आणि कुरचडे या मतदारसंघांमध्ये भंडारी समाजाचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. त्यामुळे या मतदारसंघांमधून जर भंडारी समाजाच्या उमेदवारांचा विजय झाला तर मुख्यमंत्रीपदासाठी आणि एकूणच सत्ता काबीज करण्यासाठी भंडारी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे.
आपने केवळ चार मतदार संघात दिले उमेदवार
जातीय गणित मांडत भंडारी समाजाच्या भावनेला हात घालत आपने अमित पालेकर हा चेहरा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केला. असे असले तरी अठरा मतदारसंघांपैकी केवळ चारच मतदारसंघात भंडारी समाजाचा उमेदवार देऊन भंडारी समाजाच्या भावना केजरीवाल यांनी काही प्रमाणात दुखावल्याचं या समाजाचे नेते अशोक नाईक सांगतात.
आपने दाभोळी मतदार संघातून बाबू नानुसकर, तळेगाव मतदार संघातून एडवोकेट अमित पालेकर, मये मतदार संघातून राजेश कळंगुटकर आणि वापई मतदारसंघातून सत्यविजय नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाने दिली सहा मतदारसंघात उमेदवारी
भारतीय जनता पार्टीने भंडारी समाजाच्या उमेदवारांना सात मतदारसंघांमध्ये उमेदवारी दिली आहे. यामध्ये मांद्रे, शिरोली, सालेगाव, पोंडा, शिरोडा आणि मार्मुगोवा या मतदारसंघांचा समावेश आहे.
काँग्रेसने दिली केवळ तीन मतदारसंघात उमेदवारी
काँग्रेस पक्षानेही भंडारी समाजाच्या की उमेदवारांना उमेदवारी दिली असून कांडकोर, मडकई आणि म्हापसा या तीन मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्यात आले आहेत.
गोव्यातील जातनिहाय मतदारांची संख्या
गोव्यामध्ये हिंदू मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ६५ टक्के हिंदू मतदार आहेत. त्यापाठोपाठ ख्रिश्चन मतदारांची संख्या ३० टक्के आहे. मुस्लिम मतदारांची संख्या अत्यंत कमी म्हणजे २.८१ टक्के इतकी आहे. तर अन्य जातीतील लोकांची संख्या २.१९ टक्के इतकी आहे. मात्र हिंदू मतदारांमध्ये विविध १९ उपजातीचा समावेश आहे. ज्यामध्ये ओबीसी समाजाचा वाटा हा ३० ते ४० टक्के इतका आहे.
एकूण मतदारांमध्ये ओबीसी लक्षणीय
गोव्यातील मतदारांची एकूण संख्या 11,11,692 (२०१७) एवढी आहे. या पैकी ओबीसी समाजाची लक्षणीय मतदार संख्या आहे. हिंदू समाजातील भंडारी हा सर्वात मोठा घटक गोव्यात मानला जातो. ओबीसी समाजाचे असलेले प्राबल्य पाहून आता राजकीय पक्षांनी आपली गणित मांडायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये आपने सर्वात आधी उडी घेतली असून त्यांनी भंडारी समाजाच्या अमित पालेकर या उमेदवाराला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे.
भंडारी समाजाला मुख्यमंत्रीपदाची अत्यल्प संधी
मतदारांच्या एकूण संख्येमध्ये भंडारी समाजाची मतदार संख्या सर्वाधिक असली तरी या समाजातील आमदाराला मुख्यमंत्रीपदी फार कमी संधी मिळाल्याचं बोललं जातं. रवी नाईक हे एकमेव भंडारी समाजाचे उमेदवार मुख्यमंत्री झाले होते. त्यालाही आता २८ वर्ष लोटल्याचे वरिष्ठ पत्रकार किशोर नाईक गावकर सांगतात. ओबीसीमध्ये जवळ-जवळ १९ घटक आहेत. त्यापैकी भंडारी समाज हा सर्वात मोठा घटक आहे. मात्र, तरीही या समाजाला फारसे प्रतिनिधित्व मिळाले नाही, असे किशोर नाईक गावकर सांगतात. गोव्यामध्ये जातीचे राजकारण फारसे केले गेले नाही. यामुळेच या मुद्द्यांकडे कुणी फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही असही नाईक सांगतात.
हे जातीचे नव्हे समाजाचे राजकारण - पालेकर
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केल्यानंतर आपचे भंडारी समाजाचे उमेदवार अमित पालेकर यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी ने समाजाला अपेक्षित असलेल्या विकास कामांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र स्थानीय राजकारणात बहुजन समाजाला फारसे प्रतिनिधित्व मिळाले नाही. त्यांची संख्या मोठी असूनही मानाचं स्थान मिळालं नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीने जरी भंडारी समाजाचा उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केला असला तरी, हे जातीचे राजकारण नाही तर एका समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी असलेलं राजकारण आहे असा दावा अमित पालेकर यांनी केला आहे.
गोव्यात पहिल्यांदाच होणार जातीय गणितांवर निवडणूक
गोव्यात कधीही यापूर्वी जातीय गणितांवर निवडणूक लढवली गेली नाही. पहिल्यांदाच ही निवडणूक जातीय गणितांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम आदमी पक्षाने याला तोंड फोडल्यानंतर भारतीय जनता पक्षानेही त्यांची री ओढली आहे. भाजपने ही आता भंडारी समाजाच्या लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विशिष्ट समाजाचे उमेदवार दिले आहेत. गोव्यातील भंडारी समाज सर्वात अधिक आहे. सुमारे १८ मतदारसंघात भंडारी समाजाचे प्राबल्य आहे. भंडारी समाजाचा मुख्यमंत्री होण्यासाठी भंडारी समाजाचे अनेक नेते प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांनी व्यक्त केली आहे. गोव्यात ओबीसींच्या १८ जाती असून त्यात भंडारी समाजाचे लोक सर्वाधिक आहेत. त्यानंतर खारवा समाज आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमातींची संख्या १२ टक्के इतकी असल्याचेही सावळ यांनी सांगितले.
कोणत्याही पक्षाने ओबीसींचा विचार केला नाही
गोव्यात मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचे प्राबल्य आहे. मात्र गोवा स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने ओबीसी समाजाला प्राधान्य दिले नाही. सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाचा केवळ वापर करून घेतला. अशा परिस्थितीत ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपली भेट घेतली आणि ओबीसी समाजाला सन्मान देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी दिली आहे. जो पक्ष आपल्या समाजाला सन्मान प्राप्त करून देईल त्याला पाठिंबा देण्याचा समाजाचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गोव्यात ओबीसी समाजात भंडारी जातीचे प्रमाण ६० टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.