पणजी - गोवा विधानसभेचे नव्या वर्षातील पहिले अधिवेशन 25 जानेवरी ते 29 जानेवारी 2021 या काळात होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यासंर्दभात अधिसूचना जारी केली आहे. 25 जानेवरीला सकाळी साडेअकरावाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जानेवरीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असेल. त्यानंतर 27 ते 29 असे कामकाज होईल.
पहिल्या तीन दिवसांत तारांकित, अतारांकित, शून्य प्रहारातील प्रश्न आणि लक्ष्यवेधी सूचनांवर चर्चा होणार आहे. तर शेवटच्या दिवशी खासगी विधेयकांवर चर्चा होईल. याच दिवशी आमदारांना तीन तारांकित आणि पंधरा अतारांकित प्रश्न विचारता येणार आहे. यामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत तारांकित, अतारांकित आणि लक्ष्यवेधी सूचना नोटीस बॉक्स अथवा ऑनलाइन पद्धतीने सादर कराव्या, असे आवाहन विधानसभा सचिवांनी केले आहे.
गोवा विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन -
मागील आठवड्यात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत विधानसभा अधिवेशन 25 जानेवारीपासून आठवडाभर घेण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती. दरम्यान 27 जुलै 2020 रोजी गोवा विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन घेण्यात आले होते. हे अधिवेशन दोन आठवडे घेण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु, याचकाळात कोरोनाचा प्रसार मोठ्याप्रमाणात वाढताना दिसू लागल्याने अधिवेशन एक दिवस घेण्यात आले होते.
हेही वाचा - 'कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच, देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांकडून स्वागत'