पणजी - विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाने आपल्या राज्यातील कोर कमिटीध्ये बदल केले. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणारे व भंडारी समाजाचे नेते अमित पालेकर यांच्या खांद्यावर गोवा राज्याची धुरा सोपवण्यात आली आहे.
आम आदमी पक्षाच्या गोवा अध्यक्षपदी अमित पालेकर यांची निवड - आगामी लोकसभा व ग्रामपंचायत निवडणुकीच्या धरतीवर राज्यात आम आदमी पक्षाने अनेक बदल केले आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाला पुन्हा एकदा यश प्राप्त करून देण्यासाठी राज्य निवडणूक प्रभारी व दिल्लीच्या आमदार अतिशी यांनी राज्याची धुरा पालेकर यांच्या खांद्यावर सोपवली आहे. पालेकर हे विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर अध्यक्ष पदाची धुरा सोपविली आहे. यासोबतच सर्व कोर कमिटीमध्ये बदल करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बदल करण्यात आल्याचा राज्य निवडणूक प्रभारी अतिशी यांनी सांगितलं.
माजी अध्यक्ष आणि टीका करून पक्ष सोडला होता - पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल म्हांबारे यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने जातीचा दाखला देऊन व जातीयवादाला चालना दिली होती, म्हणूनच पक्षाला अनेक ठिकाणी पराभवाचा व लोकांच्या रागाचा सामना करावा लागला असे वक्तव्य माजी अध्यक्ष राहुल म्हांबरे यांनी केले होते. याच कारणावरून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता.