पणजी - अपघातग्रस्त आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावरील उपचारांची पुढील दिशा ठरविण्यासाठी दिल्लीतील 'एम्स'चे वैद्यकीय पथक आज सकाळी 9 वाजता गोव्यात दाखल झाले. त्यांनी श्रीपाद नाईक यांची तपासणी केली. तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या (गोमेकॉ) डॉक्टरांशीही चर्चा केली.
कर्नाटकात सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्यांना त्याच रात्री गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी माहिपत्रात म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता एम्सच्या डॉक्टरांनी गोमेकॉच्या पथकाशी चर्चा करून उपचारांचा आढावा घेतला होता. त्यावर त्यांनी समाधानही व्यक्त केले होते. तर आज सकाळी एम्सचे पथक गोव्यात दाखल झाले. त्यांनी राज्यमंत्री नाईक यांची तपासणी केली. त्यांच्या जखमा भरत असून मलमपट्टी बदलण्यात आली आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडूनही उपचाराची माहिती-
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधावरी सकाळी एम्स आणि गोमेकॉच्या डॉक्टरांशी नाईक यांच्यावरील उपचारांबाबत चर्चा केली. तर आरोग्य विश्वजीत राणे यांनी दुपारी रुग्णालया ला भेट देऊन त्यांची विचारपूस केली. गोमेकॉ डॉक्टरांच्या उपचाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा-केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या मोटारीला अपघात; पत्नीसह पीएचा मृत्यू
एम्सच्या पथकाचे नाईक यांच्या तब्येतीवर लक्ष
सध्या नाईक यांचा रक्तदाब सर्वसाधारण आहे. नाडीचे ठोके दर मिनिटाला 96 पडत असल्याने शुद्धीवर आहेत. ते तोंडी संवादाला प्रतिसाद देत आहेत.
एम्सचे पथक गोमेकॉ डॉक्टरांच्या रोबरीने नाईक यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. गोमेकॉ डॉक्टरांकडून योग्य उपचार होत असल्याने त्यांना सध्यातरी दिल्लीला हलविण्याची आवश्यकता नाही, असे पथकाने म्हटले आहे. त्यांच्यावर सध्या सुरू असलेले उपचार ठेवावेत असे सांगण्यात आले आहे.
आवश्यकता भासली तर राज्यमंत्री नाईक यांना दिल्लीला हलविले जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी (दि. 12 जाने.) दिली होती. वाहन अपघातात नाईक यांची पत्नीस सहायकाचा (पीए) मृत्यू झाला आहे.
संबंधित बातमी वाचा-आयुषमंत्री श्रीपाद नाईकांची प्रकृती स्थिर, गोवा मुख्यमंत्री डॉ. सावंतांची माहिती