पणजी - भाजप आणि काँग्रेसकडून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला गोव्यातील युवक कंटाळले आहे. त्यामुळे ते तिसऱ्या पर्यायाच्या शोधात असून आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला निवडून असले राजकारण संपवतील, असा विश्वास ' आप' चे गोवा संयोजक एल्वीस गोम्स यांनी व्यक्त केला. मिरामार येथील पक्ष कार्यालयात त्यांनी आजपासून पणजी पोटनिवडणुकीसाठी प्रचार सुरू करत असल्याची घोषणा केली.
गोम्स म्हणाले, पणजी पोटनिवडणूक उमेदवार म्हणून वाल्मिकी नाईक यांच्या नावाची यापूर्वी घोषणा करण्यात आली. आजपासून आम्ही प्रचाराला सुरुवात करणार आहोत. तर शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत.
पणजी शहरावर २५ वर्षे भाजपची सत्ता राहिली. परंतु, त्याचा पणजीवासीयांना काहीच लाभ झाला नाही, असू सांगून गोम्स म्हणाले, राजधानी म्हणून पणजीच्या अनेक समस्या आहेत. शहराचा विकास व्हावा यासाठी अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या वाल्मिकी नाईक यांची या ठिकाणी उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याबरोबर आपचे राजकारण इतरांपेक्षा वेगळे कसे आहे. हे दिल्लीतील ' केजरीवाल' यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जाहीरनामा लागू करून दाखवून दिले आहे.
वाल्मिकी नाईक म्हणाले, पणजीत सर्व अनिश्चित आहे. मागच्या पोटनिवडणुकीत पर्रीकर यांचा पराभव करण्यासाठी एकच उमेदवार द्यावा, अशी विनंती तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी केली होती. यामुळे आपने उमेदवार उभा केला नव्हता, पण वेळी काँग्रेसने शब्द पाळला नाही.
यावेळी सरचिटणीस प्रदीप पाडगावकर, सिद्धार्थ करापूरकर, रॉनी आल्मेदा आणि वाल्मिकी नाईक आदी उपस्थित होते.