पणजी - आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज मडगावात येणार आहेत. येथील लोहिया मैदानावर संध्याकाळी ४ वाजता ते आपच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत.
आपतर्फे लोकसभेच्या दोन तर गोवा विधानसभेच्या तीन जागांवर उमेदवार उभे केले जात आहे. लोकसभेसाठी दक्षिण गोवा मतदारसंघात राज्य संयोजक एल्वीस गोम्स तर उत्तर गोवा मतदारसंघात पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रदीप पाडगावकर निवडणूक रिंगणात आहेत.
दक्षिण गोव्यातील कोळसा वाहतूक, जमीन वापर, सीआरझेड, उत्तर गोव्यातील मोपा विमानतळ, पर्यटन, टॅक्सी, अनिवासी भारतीय, राज्यातील बंद झालेला खाण व्यवसाय आदी अनेक विषयांवर येथील स्थानिक कार्यकर्ते सातत्याने आवाज उठलत आहेत. त्यामुळे केजरीवाल या विषयांवर काय बोलतात, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा जागेसाठीही १९ मे रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी आपने वाल्मिकी नाईक यांना उमेदवारी दिली आहे. त्यावरही केजरीवाल काय बोलतात हेही औत्सुक्याचे आहे.