नाशिक - लेखानगर भागात जुन्या भांडणाच्या वादातून 25 वर्षीय युवकाची टोळक्याने हल्ला करून धारधार चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. राहुल गवळी असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. महिन्याभरात या भागात दुसरी हत्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण झाले असून पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक कमी झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महिन्याभरात दुसरी हत्या -
मंगळवारी नऊ वाजेच्या सुमारास राहुल गवळी (25 ) या तरुणास अंबड येथील कारगिल चौक परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयितांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून प्राणघातक हल्ला करत धारदार शस्त्राने भोसकले. यात राहुल हा गंभीर जखमी झाल्याने या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हल्लेखोर नेमके कोण होते, याबाबत अद्याप पोलिसांना सुगावा लागला नसून अंबड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडकोतील स्टेट बँक चौपाटीजवळ असलेल्या सोनाली मटन खानावळीसमोर गेल्या बुधवारी 28 जुलै रोजी रात्री एका तरुणाचा खून केल्याचा प्रकार ताजा असताना मंगळवारी पुन्हा असाच प्रकार घडला आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीत महिनाभरात दोन खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - महामारीत आशादायी चित्र; एप्रिल ते जून तिमाहीच्या जीडीपीत 21.1 टक्क्यांची वाढ