नाशिक - शहरातील गळफास घेत एका तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ तयार केला असून व्हिडिओनुसार भद्रकाली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्या त्रासाला कंटाळून या युवकाने आत्महत्या केली आहे. योगेश शेवाळे, असे त्या तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येपूर्वी व्हिडिओ क्लिप केली व्हायरल
नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यामुळे शहरभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच आता शहरातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पेलणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून नाशिकच्या गंजमाळ भागात राहणाऱ्या योगेश शेवाळे युवकाने आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मृत युवकाने भद्रकाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याचे नाव घेत आपण या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. सोमवारी (दि. 1 मार्च) रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
आपल्या मित्र तसेच नातेवाईकांना व्हिडिओ फॉरवर्ड करून या युवकाने भीम नगर येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. युवकाच्या आत्महत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे भीम नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून भद्रकाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - सोशल मीडियावरून महिलांना अश्लील फोटो पाठवणाऱ्या डॉक्टरला अटक