नाशिक - कौन बनेगा करोडपती शोच्या नावाखाली नाशिकमध्ये एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनोळखी फोन कॉल्सवर नागरिक विश्वास ठेवून आमिषांना बळी कसे पडतात, असा प्रश्न सद्या उपस्थित होत आहे.
नाशिकमध्ये राहणाऱ्या एका महिलेला 7 जुलै रोजी अनोळखी व्यक्तीचा फोन आला. हॅलो मी कौन बनेगा करोडपती मधून बोलतोय आपल्याला कोण बनेगा करोडपती या शोचे तिकीट लागले आहे. त्यात आपल्याला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. हे ऐकल्यावर महिलेला देखील आंनद झाला. मात्र, काही वेळेतच या व्यक्तीने सांगितले की लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी काही रक्कम तुम्हाला भरावी लागेल.
महिलेने हे ऐकल्यावर त्यांना थोडा वेगळा संशय आला. मात्र 25 लाख रुपयांची लॉटरी म्हटल्यावर ती महिला आमिषाला बळी पडली. त्या संशयितांच्या म्हणण्याप्रमाणे दिलेल्या अकाउंटवर महिलेने दहा दिवसात 2 लाख 86 हजार रुपये रक्कम जमा केली. मात्र, संशयिताने सांगितल्याप्रमाणे लॉटरीचे पैसे काही मिळाले नाहीत. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.