नाशिक - वाइन हे नाशिक जिल्ह्याचे प्रॉडक्ट असल्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहे. वाइन उद्योग आणि नाशिकच्या वाइन पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद करावी, अशी मागणी नाशिकच्या वाइन उद्योजकांनी केली आहे.
अनेक वाइनरी झाल्या बंद
काही दिवसांपूर्वीच वाइन हा नाशिकचा ब्रँड असल्याचे केंद्र सरकरने घोषित केले आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. तसेच नाशिक जिल्ह्यात 20हुन अधिक नामांकित वाइनरी असून नाशिकची वाइन देशासह विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. सुरवातीला नाशिक जिल्ह्यात 40 ज्या जवळपास वाइनरी होत्या, मात्र मध्यंतरीच्या काळात योग्य मार्केटिंग आणि वाइनला असलेली कमी मागणी त्यामुळे अनेक वाइनरी बंद झाल्या. अशात येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात वाइन उद्योग आणि नाशिकच्या वाइन पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने भरघोस निधीची तरतूद करावी, हॉटेलवर असलेला जीएसटी कमी करावा व रेस्टॉरेंटसाठी इनपुट टॅक्स क्रेडिटची सुविधा सुरू करावी, अशी मागणी नाशिकच्या वाइन उद्योजकांनी केली आहे.
'वाइनला दारूच्या श्रेणीतून वगळावे'
वाइन योग्य प्रमाणात घेतल्यास आरोग्यासाठी लाभदायक असून सरकारने वाइन उद्योगाला चालना देण्यासाठी ती दारूच्या श्रेणीतून वगळावी, अशी मागणी वाइन उद्योजकांनी केले आहे. तसेच अनेक वाइननिर्मिती उद्योग हे ग्रामीण भागात असून तेथे चांगले रस्ते, लाइट आणि मुबलक पाणी नसल्याने अडचणी निर्माण होत असून सरकारने या उद्योगाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी पायाभूत सुविधा उभाराव्यात, अशी मागणी वाइन उद्योजकांनी केली आहे.