नाशिक - शहरवासियांची तहान भागविणारे गंगापूर धरण ९४ टक्के भरले आहे. त्यामुळे रविवारी दुपारी एक वाजता धरणातून ५०० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या हंगामातील हा पहिला विसर्ग ठरला आहे.
गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर व अंबोली घाट परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने धरण ९४ टक्के इतके भरले आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्ग करावा लागेल, असे जिल्हाप्रशासनाने एक दिवस अगोदरच जाहीर केले होते.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवून खबरदारी घेण्यात आली. त्यानूसार रविवारी दुपानंतर धरणाचे पाच नंबरचे गेट एक फुटाने वर करुन गोदावरी नदीच्या प्रात्रात पाणी सोडण्यात आले. हळूहळू विसर्गाचा वेग वाढवून १५०० क्यूसेस केला जाणार आहे.
धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. पाणी पातळी वाढणार असल्याने गोदा काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रात पाणी सोडण्यापूर्वी पोलिसांनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन सतर्कतेचा इशारा दिला होता.