नाशिक - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे येणार होते. मात्र अमित शाह यांचा 21 जूनचा त्र्यंबकेश्वर येथील दौरा रद्द झाला आहे. आता केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.
म्हणून शाह यांचा दौरा रद्द - केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार केंद्र सरकार तरुणांना चार वर्ष भारतीय सैन्यात काम करण्याची संधी देणार आहे. पण केंद्र सरकारच्या योजनेला देशभरात प्रचंड विरोध होत आहे. काही ठिकाणी तर रेल्वे जाळण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात या योजनेवरुन युवकांमध्ये दिवसेंदिवस रोष वाढत आहे. त्यामुळे अग्निपथ योजनेवरुन देशातील वातावरण तापल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नियोजित दौरा रद्द झाल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले आहे.
यांच्या उपस्थित होणार कार्यक्रम - श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे होणाऱ्या शिलान्यास कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून प्रशासकीय पातळीवर तयारीचा आढावा घेण्यात आला. या गुरुपीठात चाळीस हजार चौरस फुटाचा मंडप व एक हजार चौरस फुटाचे व्यासपीठ उभारण्यात येत असल्याची माहिती गुरुपीठाचे चंद्रकांत मोरे व नितीन मोरे यांनी दिली आहे. सेवामार्गाची प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी तयारीचा आढावा घेतला आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अशोक चव्हाण, दादा भुसे, धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह खासदार, आमदार उपस्थित असणार आहेत.
चॅरिटेबल हॉस्पिटल ठरणार वरदान - प्रस्तावित रूग्णालयात गरजू रुग्णांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मोफत उपचार केले जातील, अशी माहिती गुरुमाऊली यांनी दिली. किडनी, हृदय, मेंदू, अस्थीरोग, स्त्रीरोग अशा आजारांवर उपचार मिळतील. एमआरआय, सिटी स्कॅन अशा अत्याधुनिक तपासण्याही या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. तीन लाख चौरस फुटाचे हे सात मजली हॉस्पिटल गरजू रुग्णांना वरदान ठरणार आहे.
असा असेल कार्यक्रम - केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचे सोमवारी शासकीय विश्रामगृहावर रात्री दहा वाजता आगमन होणार आहे. ते शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करणार आहेत. 21 तारखेला सकाळी सव्वासहाला त्रंबकेश्वर येथे योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सकाळी 7 30 ते 10 पर्यंतचा वेळ राखीव असून त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. 10.45 वाजता योग विद्या धाम आश्रम येथे रवाना होतील. 11 30 ला स्वामी समर्थ गुरुपीठ सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या शिलापूजन कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.