नाशिक - कोरोना महामारीच्या काळात नाशिक शहर आणि जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सामान्यांचे रक्षण करण्यासाठी पोलीस कर्मचारी दिवस रात्र कर्तव्य बजावत आहे. त्यातून काही पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. मात्र, असे असले तरिही पोलीस आपले कर्तव्य तितकेच चोखपणे बजावत आहेत. यातच आता पोलिसांबाबत आदर वाढवणारी आणखीन एक बाब समोर आली आहे. कोरोना बंदोबस्तात थोडी उसंत मिळाल्यानंतर नाशिकच्या वाहतूक शाखेतील कर्मचारी सचिन जाधव यांनी 'टाकाऊ पासून टिकाऊ' या कल्पनेचा वापर करत, रस्त्यावर पडलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर करून पोलीस चौकी परिसरात बाग फुलवली आहे.
हेही वाचा... शाब्बास..! लॉकडाऊनमध्ये बाप-लेकाने खोदली विहीर, पाणी प्रश्न कायमचा मिटवला
लॉकडाऊनच्या काळात हजारो परप्रांतीय मजूर आणि कष्टकरी नागरिक पायी प्रवास करत आपापल्या घरी जात होते. त्यावेळी नाशिकमार्गे जाणाऱ्या नागरिकांना काही सामाजिक संस्थानी अन्न आणि पाणी उपलब्ध करुन दिले. त्यामुळे पाण्याच्या शेकडो बाटल्या महामार्गजवळ पडल्या होत्या. या बाटल्या गोळा करत वाहतूक पोलीस शाखेचे कर्मचारी सचिन जाधव यांनी पोलीस चौकीच्या परिसरातच एक सुंदर बाग फुलवली आहे. या बाटल्यांमध्ये त्यांनी चिनी गुलाब प्रकारच्या फुलझाडांची लागवड केली आहे. जाधव यांच्या या उपक्रमाचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कौतुक केले आहे.
राज्य राखीव पोलीस दलात असताना आम्हाला अशा कल्पना राबवता येतील, याचे प्रशिक्षण दिले होते : सचिन जाधव
'मी 16 वर्ष राज्य राखीव पोलीस दलात काम करत होतो. तिथे आम्हाला टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे धडे दिले होते. त्याचा फायदा मला झाला आहे. लॉकडाऊन काळत हजारो परप्रांतीय नागरिक मुंबईहून पायी चालत नाशिक मार्गे त्यांच्या घरी जात होते. तेव्हा त्यांना अनेक सामाजिक संस्थांनी जेवण आणि पाणी बाटल्या दिल्या होत्या. त्यातील अनेक बाटल्या रस्त्यावर पडल्या होत्या. त्या बाटल्या गोळा करुन त्यात माती टाकून चिनी गुलाबाची फुलझाडे लावली आहेत.' असे सचिन जाधव यांनी सांगितले.