नाशिक - नाशिक-त्रंबकेश्वर महामार्गालगत असलेल्या आधारतीर्थ आश्रमाच्या समोर (तुपादेवी फाटा) या ठिकाणी रात्री 2 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एका तीन महिन्यांच्या बाळाला रस्त्याच्या कडेला अक्षरशः फेकून दिले होते. ह्या घटनेमुळे नाशिकमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मूल होत नाही म्हणून अनेक जण कित्येक वर्षे हॉस्पिटलच्या चकरा मारतात, देवाला नवस करतात. तरीही, अनेक दाम्पत्याना मुलाचे सुख मिळत नाही. मात्र, दुसरीकडे
मुलांना वाऱ्यावर सोडून देणारेही कमी नाहीत. अशीच एक संतापजनक घटना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महामार्गावर घडली. 10 तारखेच्या मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तीन महिन्यांच्या बाळाला रस्त्याच्या कडेला अक्षरशः फेकून दिले होते. बाळ जोरजोरात रडत होते.
हेही वाचा - भांडण झाल्यानंतर घरातून निघून आली पश्चिम बंगालची तरुणी, आईवडिलांचा शोध घेत दिले ताब्यात
शेजारीच आश्रमात झोपलेल्या अनाथ मुलांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी लगेच आश्रमात सांभाळ करणाऱ्या मावशीला ही बाब सांगितली. त्यानंतर या मावशींनी गेटच्या बाहेर जाऊन बघितले तर, एक निरागस बाळ रडत असल्याचे त्यांना दिसले. हे बाळ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गटारीत होते. त्यांनी तत्काळ आश्रमातील अध्यक्षांना ही बाब कळवत नाशिक पोलीस नियंत्रण कक्षालाही कळवले.
मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालणाऱ्या त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे कर्मचाऱ्यांसह काही वेळातच घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी लगेच आपल्या वाहनातून बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बाळाला तपासून बाळाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगितले. हे पुरुष जातीचे बालक आहे. यानंतर बाळाला बालकल्याण समिती समोर हजर करून त्यांनी बाळाला घारपुरे घाट येथील आधार आश्रमात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे त्रंबकेश्वर पोलीस या बाळाच्या आईचा शोध घेत असून ह्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा - लोणावळ्यात प्रदूषण वाढू नये यासाठी 'सायकल डे'चे आयोजन; सुनील शेट्टी यांच्या हस्ते उदघाटन