नाशिक - नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या जन्मतारखेचा घोळ समोर येत असून कागदपत्रांनुसार बाराव्या वर्षी दहावी उत्तीर्ण असल्याचे समोर येत आहे. याबाबात बोलण्यास मात्र दिघावकर यांनी टाळाटाळ केली आहे.
'योग्य कागदपत्रे कार्यालयाला द्या'
शाळेतील कागदपत्रांनुसार प्रताप दिघावकर वयाच्या केवळ बाराव्या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेत, असे स्पष्ट होत आहे. त्यामुळे खात्री करा आणि योग्य कागदपत्रे कार्यालयाला द्या, अशी सूचना दिघावकर यांनी शिक्षण घेतलेल्या निटाणे इथल्या नूतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. दिघावकर यांनी 1970मध्ये शाळेत प्रवेश केला आणि 1976मध्ये शाळा सोडल्याचा त्यांचा दाखला आहे. त्यामुळे त्यांनी कधी, कोणत्या वर्षासाठी शाळेत प्रवेश घेतला याची माहिती विचारण्यात आली आहे.
अडचणी वाढल्या
त्यांची जन्मतारीख 31 मे 1964 आहे, असे यात म्हटले आहे. हाच दाखला दिघावकर यांनी MPSC आणि गृहखात्याला सादर केला आहे. याच दाखल्यात मार्च 1976 दहावी पास झाल्याचा उल्लेख आहे. चक्क 12व्या वर्षी दहावी पास असल्याचे दिसून येत असल्याने दिघावकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
'प्रकरण सरकारने बंद केले'
दिघावकर यांच्या सर्व शिक्षणाबद्दल, गृह खात्याकडे तक्रार करण्यात आली असून पोलीस महासंचालक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण सरकारने बंद केले आहे. माझी जन्मसाल 1961 ग्राह्य धरण्यात आली आहे. मी 1 मे रोजी निवृत्त होत आहे. माझ्याकडूनच अर्ज करण्यात आला होता. पण हा विषय आता संपला आहे, असे ते म्हणाले.
कोणकोणती शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आहेत?
- उस्मानिया विद्यापीठाच्या डिग्री
- USA विद्यापीठ डबल MBA आणि उस्मानिया विद्यापीठ डिग्री
- डिस्टन्स लर्निंग एज्युकेशन
- mpsc उत्तीर्ण