नाशिक - गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये तापमानाचा पारा 13 अंशावरुन आज शुक्रवारी ६ अंशापर्यंत येऊन ठेपला. तर जिल्ह्यातील निफाडमध्ये सर्वात कमी 2.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. तसेच वाऱ्याचा वेग देखील ताशी 13 किमी असल्याने गारठा वाढला आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातही तोरणमाळ येथे कडाक्याची थंडी पडली आहे. नागरिक चौकाचौकात शेकोटी पेटून थंडीपासून बचाव करत असल्याचे चित्र दिसत आहे. नाशिकमध्ये या मोसमातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद आज झाली असून, राज्यभर काही जिल्ह्यांमध्ये तापमान कमी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - हॅप्पी विंटर! गूगलने तयार केलं 'विंटर सोलस्टाइस'2019' हे खास डूडल
नाशिक शहरातील नागरिक एकीकडे गुलाबी थंडीचा आनंद घेत असले तरी, मोठ्या प्रमाणात पडलेल्या थंडीमुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षांना तडा जाणे, डावणी सारख्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. यंदा पावसाळा उशिरापर्यंत राहिल्याने नाशिकमध्ये थंडीचे उशिराने आगमन झालं असल्याने यंदा काहीकाळ अधिक थंडी राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नंदुरबारमध्ये कडाक्याची थंडी -
थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे तापमानाचा पारा घसरला असून सातपुडा चांगला गारठला आहे. तापमान 5 सेल्सिअसच्या खाली गेल्याने रस्त्याच्या कडेला दवबिंदू गोठले आहेत. त्यामुळे बर्फाची चादर झाल्याचे दिसून आले आहे. परिसरात थंडीचे वातावरण वाढल्याने जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे.
पुणेकर थंडीने गारठले -
पुणे शहर आणि परिसराला डाक्याच्या थंडीने गारठून टाकले आहे. गुरुवारी दिवसभर थंडगार वारे वाहत होते, तर शुक्रवारी पहाटे गारठणारी थंडी अनुभवायला मिळाली. शुक्रवारी पुण्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. त्यामुळे पुणेकरांची शुक्रवारची पहाट कडाक्याच्या थंडीत गेली. संपूर्ण राज्यात सध्या हवामान कोरडे राहणार राहणार असल्याने पुढील चार दिवसांमध्ये थंडी वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुणे शहरातही गारठ्यात आणखी वाढ होणार आहे. शहरात पहाटे दाट धुके देखील अनुभवायला मिळाले. उत्तर भारतातून थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत त्यामुळे दोन दिवसांपासून दिवसाच्या तापमानाचा पारा घसरत आहे.
मराठवाड्यात गारवा वाढला -
मराठवाड्यात किमान व कमाल तापमानात घसरण सुरू झाली असून, गारठा वाढत चालल्याचा थंडगार अनुभव लोकांना मिळत आहे. औरंगाबाद किमान तापमान 15.5 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे तर परभणी 15.5 अंश सेल्सीअस तर नांदेडमध्ये 14 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे.