नाशिक - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शहरातील शिवसेना कार्यालयाबाहेर नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. राज्यभरासह शहरातही राणेंच्या विरोधात शिवसैनिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
भाजपाचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे नाशिक शहरातील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. नाशिकमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली आहे. नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य हे आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी शालिमार येथील शिवसेना कार्यालयाबाहेर नारायण राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारत त्यांचा प्रतिकात्मक जाळला आहे.
आंदोलनादरम्यान कोरोना प्रादुर्भावाचा विसर...
संतप्त शिवसैनिकांनी नारायण राण्यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली आहे. दरम्यान शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त अधिक अधिक कडक करण्यात आला आहे. आंदोलना दरम्यान शिवसैनिकांनी कुठेही कोरोना नियमांचे पालन केले नसल्याचे दिसून आले. सर्वसामान्यांसाठी प्रशासन कठोर कारवाई करते. परंतु राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई का करत नाही ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा-नारायण राणेंच्या वक्तव्याचे समर्थन नाही, पण भाजप त्यांच्या पाठीशी - देवेंद्र फडणवीस
गुलाबराव पाटलांनीही राणेंवर केली टीका-
'नारायण राणे हे गरिमा नसलेले भूत आहे. त्यांना काय बोलावे, याचे भान राहत नसेल तर ठाण्यातील वेड्यांच्या इस्पितळात दाखल करून शॉक द्यायला पाहिजे. मला तर त्यांची कीव येते', अशी शब्दांत शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर जळगावात जहरी टीका केली आहे.
दरम्यान, नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोलीस गेले. मात्र, त्यांच्याकडे अटक वॉरंट नाहीत. तसेच आमच्यावर दबाव आहे, असे पोलिसांनी म्हटले असल्याची माहिती जनआशीर्वात यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार यांनी दिली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना अखेर अटक केली आहे.