नाशिक - दरवर्षी 14 डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त नेविटास इफिसेन्स कंपनीचे संचालक अमित कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिलं नेट मीटरिंग असलेली 'सोलार ट्री' साकारण्यात आली आहे. आकर्षक आणि कमी जागेत बसून ऊर्जा निर्मिती करणारी प्रणाली असल्याने सजावटीचे आणि तंत्रज्ञानाचे सुरेख एकत्रीकरण यात करण्यात आले आहे.
हेही वाचा - भगूरमध्ये सावरकर प्रेमींनी केला राहुल गांधींचा निषेध
दिवसेंदिवस विजेची मागणी खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. विजेच्या निर्मितीचे स्त्रोत मर्यादित आहेत. पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजेच खनिज तेल, कोळसा या गोष्टी पुढील 20 वर्षे टिकेल अशी परिस्थिती आहे. धरणांची संख्याही मर्यादित असून जलविद्युत निर्मिती प्रकल्पही मर्यादित आहेत. आता घरोघरी एसी, फ्रीज इत्यादी उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बऱ्याच भागात विजेचा तुटवडा जाणवायला लागत आहे. यामुळे अनेक शहरांना लोडशेडिंगलाही सामोरे जावे लागत आहे. कारखान्यांचीही विजेची मागणी वाढत चालली असून त्यांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तसेच हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामाचा फटका शेतीला सगळ्यात जास्त प्रमाणात बसत असतो. ही फक्त भारताची समस्या नसून जागतिक समस्या म्हणून समोर येत आहे.
नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढावा यासाठी सरकारने जनतेला केलेल्या आव्हानाचा चांगला परिणाम पाहायला मिळत आहे. उद्योगांनंतर आता घरगुती वीज ग्राहकही स्वस्त विजेचे उत्पादन करून महावितरणला वीज विक्री करू लागले आहेत. नाशिकमध्ये राज्यातील पहिल्या सोलार ट्री ची उभारणी झाली आहे. अवघ्या 2 बाय 2 फूट आकाराच्या जागेत ही ट्री उभी राहते. 1 ते 3 किलो वॅट क्षमतेच्या या ट्रीद्वारे 18 युनिटपर्यंत रोज वीज उत्पादित होते.
हेही वाचा - सरकारी तेल कंपन्याच्या खासगीकरणाला पेट्रोल डीलर्सचा विरोध, निर्णयाविरोधात न्यायालयात घेणार धाव...
नाशिकमधील तरुण उद्योजक व संशोधक अमित कुलकर्णी यांनी सौर ऊर्जेचा वापर वाढावा यासाठी निरनिराळ्या संकल्पना आणल्या आहेत. ऊर्जा सवर्धनासाठीच्या त्यांच्या प्रयोगाला अमेरिकेतील मसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे जागतिक पारितोषिक मिळाले आहे. तसेच सलग दोन वर्ष तेथील शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली आहे. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवसाचे औचित्य साधून सोलर ट्री बघण्यासाठी नागरिकांना ते खुले करण्यात आले होते.