नाशिक - नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात कोरोना बाधितांना देण्यात येणाऱ्या रेमडीसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या प्रमुख फार्मा बाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या असून कोरोनाने भीषण रूप धारण केल आहे.
दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात मोठा रेमडीसिव्हरचा मोठा तुटवडा-
कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना रेमडीसिव्हर मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक चांगलेच हैराण झाले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील हॉस्पिटल आणि मेडिकलला रेमडिसिव्हर पूरवठा करणाऱ्या नाशिक मधील प्रमुख फार्मा बाहेर रेमडीसिव्हर घेण्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात मोठा रेमडिसिव्हरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे .आणि त्याचाच परिणाम आज नाशिक मध्ये बघावयास मिळाला. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अचानक झालेला कोरोनाचा उद्रेक यामुळे हे भयावह चित्र निर्माण झालं आहे. अनेक नागरिक पहाटे पासून रांगा लावून फार्मा दुकानांबाहेर उभे आहेत.
नागरिकांनी एफडीए अधिकाऱ्यांना घातला घेराव-
रेमडीसिव्हर इंजेक्शन घेण्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांनी फार्मा कंपन्या बाहेर गर्दी केल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना समजताच त्यांनी एफडीए विभागाच्या अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पाचारण केले. यावेळी अधिकाऱ्यांनीही तातडीने गर्दीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी या दुकानांबाहेर रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी एफडीए अधिकाऱ्यांना घेराव घालत तक्रारींचा पाढा वाचला. मात्र हतबल झालेल्या अधिकाऱ्यांनीही या नागरिकांना संयम बाळगण्याची विनंती करत रेमडीसिव्हर कमी पडू दिले जाणार नाही, असं आश्वासन दिलं आहे.
रेमडीसिव्हरचा काळाबाजार होत असल्याचा नागरिकांचा आरोप-
मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर विजय फार्मसी या औषधी दुकानात रेमडीसिव्हर इंजेक्शन घेण्यासाठी गरजू रुग्णांच्या नातेवाइकांनी एकच गर्दी केली आहे. त्यामुळे पोलिसांना ही गर्दी पांगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. एकीकडे पुरेसा उपलब्ध इंजेक्शन साठा असल्याचं सांगितलं जातं मग हा इंजेक्शन चा साठा नेमका जातो तरी कुठे? नागरीकांना पडला आहे. एकीकडे हे इंजेक्शन शासकीय दरानुसार बाराशे रुपयांना मिळणे अपेक्षित असताना दुसरीकडे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काळ्याबाजारात हे इंजेक्शन साडेचार ते पाच हजार रुपयांना विकले जात असल्याने औषध दुकानदारांकडून इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. ज्या नागरिकांना कोरोनाचा सामना करावा लागला नसेल त्यांनी ही परिस्थीती बघून तरी कोरोनाचे नियम पाळन गरजेचं आहे.