नाशिक - मालेगाव शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. शहरातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी शासकीय आरोग्य सेवेला खासगी आरोग्य सेवेची जोड देण्यासाठी आय.एम.ए. आणि निमा संस्थेच्या डॉक्टरांचे योगदान मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासह आरोग्य सेवेच्या फेरनियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, आय.एम.ए. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मयुर शहा, डॉ. अविनाश पवार, डॉ. विनीत देवरे, तर निमा मालेगावचे डॉ. दिपक पाटील आणि निमा ग्रामीणचे डॉ. सुधाकर पाटील यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
हेही वाचा... 'डायरेक्ट मनी ट्रान्स्फर' फक्त गरीबांपुरत मर्यादित नसावं, ६० टक्के जनतेच्या हातात जास्त पैसा द्यावा'
सर्वांनी मिळून समन्वयाने संकटाचा सामना करणे आवश्यक...
'कोविड आणि नॉन कोविड रुग्णांची उपचार पध्दती आपण व्यवस्थितपणे सुरु ठेवल्यास चांगला रिझल्ट मिळेल. पश्चिम भागात आतापर्यंत विशेष अडचण नव्हती. परंतु आपण एकदरीत अनुभव लक्षात घेता, सर्वांनी मिळून समन्वयाने या संकटाचा सामना करणे आवश्यक आहे. त्याची पुर्वतयारी आवश्यक आहे. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवण्याची गरज आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आतापर्यंत पुर्व व पश्चिम भागासाठी जे नियोजन करण्यात आले होते, त्याचे फेरनियोजन करण्याची गरज आहे. त्याच नियोजनाचा आज आढावा घेण्यात आला असून स्थानिक प्रशासनाकडून चांगली तयारी करण्यात आली आहे' असे यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.
'वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना केअर सेंटरची संख्या वाढवावी लागेल. पुर्व भागातील शाळांमध्ये आणि खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरु करण्यात येणार आहे. तर पश्चिम भागात महात्मा गांधी विद्या मंदीराचा संपुर्ण परिसरामध्ये फिवर क्लिनीक, स्वॅब घेण्याची सुविधा, कोविड केअर सेंटर, अशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे' असेही जिल्हाधिकाऱ्यांनी योवळी सांगितले.
आय.एम.ए. आणि निमा या संस्थेतील डॉक्टर्स देणार विनामुल्य सेवा...
'मालेगाव या ठिकाणी आय.एम.ए. आणि निमा या संस्थेतील सर्व डॉक्टर्स सदस्यांनी विनामुल्य आरोग्य सेवा देण्यासह आरोग्य सुविधांचा एक सुक्ष्म आराखडा तयार केला आहे. यातून निर्माण होणाऱ्या सक्षम आरोग्य सेवेचे एक रोड मॉडेल तयार होणार आहे' असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी सांगितले. यानंतर जिल्हाधिकारी मांढरे यांनी शहरातील हज हाऊसला भेट दिली. तसेच माळदे शिवारातील घरकुलांमध्ये उभारण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची पहाणी करुन आढावा घेतला.