नाशिक- डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांचा झालेला मृत्यू ही दुर्देवी घटना आहे. याची चौकशी झाली पाहिजे. तसेच पुन्हा अशी घटना होणार नाही याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.
विरोधी पक्षनेते दरेकर यांनी डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये येऊन घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारतला प्रतिक्रिया दिली. राज्यात ऑक्सिजनचा असलेला पुरवठा सुरळीत करावा, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. पुढे दरेकर म्हणाले, की घटनास्थळ जाऊन पाहणी केली. घटना का घडली, याची माहिती घेत आहे. निष्काळजीपणा व बेजबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी करणार आहे. पण, निष्पापांच्या मृत्यूची कोण जबाबदारी घेणार आहे. युद्धपातळीवर ऑक्सिजनचा साठा करायला पाहिजे. गतीने सुविधा पुरविले पाहिजे, अशीही अपेक्षा दरेकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा-डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती; 22 जणांचा मृत्यू
ऑक्सिजन गळतीत 61 रुग्णांची प्रकृती चिंताजनक-
महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याची घटना घडली आहे. ऑक्सिजन गळती झाल्यामुळे रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाला. या घटनेत तब्बल 61 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. तर या दुर्देवी घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये 11 पुरूष आणि 11 स्त्रियांचा समावेश आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
हेही वाचा-नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत
ऑक्सिजन वॉल लिकेज झाल्याने गळती
ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टॅंकरमधून ऑक्सिजन वाहिन्यांमध्ये ऑक्सिजन सोडण्यात येत होता. याच वेळी ऑक्सिजन वॉल लिकेज झाल्याने गळती झाली. दरम्यान या घटनेमुळे आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही रुग्ण दगवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.