नाशिक - पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आज माणुसकीचे दर्शन घडवले. मानव कॅन्सर सेंटर येथे कॅन्सरग्रस्त सागर बोरसे या तरुणाने ऑपरेशन पूर्वी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. डॉ. राज नगरकर यांनी या बाबत नांगरे पाटील यांना विनंती केली. त्यावर लगेच विश्वास नांगरे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन सागरची भेट घेत त्याचे मनोबल वाढवले.
सागर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना आदर्श मानतो. त्यामुळेच एक कार्यक्षम आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून सागर वाटचाल करत आहे. मात्र नियतीला हे बहुतेक मान्य नव्हते असेच म्हणावे लागेल. सागराला कॅन्सर सारखा दुर्धर आजार जडला. याच कॅन्सरमुळे त्याचा एकपाय गुडग्यापासून काढण्याची शास्रक्रिया होती. मात्र त्या आगोदर सागरने स्वतःचे आयकॉन असलेले आयपीएस अधीकारी विश्वास नांगरे पाटील यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. राज नगरकर यांनी नांगरे पाटील यांना फोन करून सागरची शारिरीक परिस्थिती आणि त्याने व्यक्त केलेल्या इच्छेबाबत सांगितले.
क्षणांचाही विलंब न करता विश्वास नांगरे पाटील रुग्णालयात पोहोचले. त्यांनी सागरची भेट घेतली. यावेळी सागरशी बोलून त्याचे मनोबल त्यांनी वाढवले. आपली टोपी सागरला घालत हातात काठी देत तू आयपीएस नाही, तर आयएस अधिकारी होशील, अशा शुभेच्छा दिल्या. आपल्या आवडत्या महानायकाची भेट झाल्याने सागरच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास दिसून आला. याबरोबरच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दाखवलेल्या माणुसकीचे दर्शन घडले.