नाशिक - नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनासंदर्भात आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी आणि साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत सर्वानुमते कवीवर्य कुसुमाग्रजांचं नाव साहित्य संमेलनाला देण्याचा निर्णय झाला आहे.
सर्वानुमते कवी कुसुमाग्रजांचं साहित्य संमेलनाला नाव देण्याचा निर्णय-
नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाला कवीवर्य कुसुमाग्रजांचं नाव देण्याचा निर्णय झाला असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. साहित्य संमेलनाबाबत अनेकांच्या सूचना आल्या त्यामुळे विविध क्षेत्रातील सूचनांची नोंद घेण्यात आली आहे. बैठकीत सर्वानुमते कवी कुसुमाग्रजांचं साहित्य संमेलनाला नाव देण्याचा निर्णय झाला आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या पटांगणात २६,२७,२८ मार्च दरम्यान, हे साहित्य संमेलन पार पडणार आहे.
नाशिकला अतिशय उत्तम प्रकारचे साहित्य संमेलन होईल. राज्य सरकारने साहित्य संमेलनाला ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केल्याबद्दल भुजबळांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे. साहित्य संमेलन चांगले आणि दर्जेदार होईल परंतु कोरोनाचे सर्व नियम पाळणे आवश्यक असल्याचे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.
सैन्यासारखेच महत्त्व पोलिसांना-
पोलिसांवर हल्ले वाढत असल्याच्या घटना घडत आहेत. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली, देशाच्या सीमेवरचे सैनिक जेवढे महत्त्वाचे आहेत. तेवढेच महत्त्व राज्यामध्ये तसेच शहर गावात पोलिसांचे आहे. पोलिसांविषयी तक्रार असल्यास वरिष्ठांकडे तक्रार करावी, त्याची चौकशी केली जाईल. परंतु पोलिसांवर हात उगारणे चुकीचे आहे, असे पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा- ..तर नारायण राणे कोकणात काही तर काम करत बसले असते; गुलाबराव पाटलांचा निशाणा