नाशिक - कुठलेही ग्रहण संपल्यानंतर स्नान करण्यासाठी पवित्र ठिकाणी गर्दी होत असते. त्याच पार्श्वभूमीवर आज चंद्रग्रहण संपल्यानंतर नाशिकच्या रामकुंडावर नागरिकांनी स्नानासाठी गर्दी केली होती.
भारतासह जगातल्या अनेक देशांत मंगळवारच्या रात्री खंडग्रास ग्रहण पाहिले गेले. मध्यरात्री १ वाजून ३१ मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू झाले. ते पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी संपले. विशेष म्हणजे चंद्रग्रहण हे नेहमीच पौर्णिमेला होत असते. परंतु, तब्बल १४९ वर्षांनंतर गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहण असा योग जुळून आला होता.
चंद्रग्रहण सुरू होताच पंचवटीसह शहरातील सर्वच मंदिरे बंद करण्यात आली होती. तर काही मंदिरांचे गाभारे बंद ठेवण्यात आले होते. हे ग्रहण संपल्यानंतर सकाळी रामकुंडावर गर्दी झाली होती. ग्रहणात अनेक भाविकांनी गोदावरी नदीत स्नान करून पूजा केली. यात महिला, पुरुष आणि तृतीयपंथीयांचादेखील समावेश होता.