नाशिक - शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. त्यातच आता कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांचा मृतदेह नातेवाईकांना स्मशानभूमीमध्ये न्यावा लागत आहे. मात्र, या नातेवाईकांना पीपीई कीट पुरविल्या जात आहेत.
नाशिक महानगर पालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाला स्मशानभूमीपर्यंत पोहोचविण्यासाठी कर्मचारीच मिळत नाही. त्यामुळे नातेवाईकांनीच आपल्या रुग्णाचा मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जावा, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. मात्र, संबंधित नातेवाईकांना पीपीई किट पुरविण्यात आले. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका कमी आहे. तरीही रुग्णालयात कर्मचारी नसल्याने रुग्णांचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.