नाशिक (येवला) - कांदा व्यापार्यांच्या प्रतिनिधीकडून शेतकऱ्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ बुधवार (दि. 23) रोजी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन केले.
बाजार समिती कार्यालयापुढे ठिय्या
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील ममदापूर येथील अक्षय गुडघे या तरुण शेतकऱ्याला कांदा व्यापार्यांच्या प्रतिनिधीकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ हे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
'...तर तीव्र आंदोलनाचा इशारा'
रविवारी कांदा व्यापारी हे संबंधित मारहाण झालेल्या शेतकऱ्यांची माफी मागणार असल्याने, यावेळी हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, रविवारी कांदा व्यापाऱ्यांनी संबंधित शेतकरी माफी मागितली नाही, तर परत आंदोलन छेडण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या वतीने देण्यात आला आहे.